रामटेक – राजु कापसे
राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे २७ फेब्रुवारीला संस्थेचे सचिव मयंकराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली ‘दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभीष्टचिंतन व मराठी राजभाषा दिन आणि वार्षिक सरस्वती पूजन’ सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त पर्यवेक्षक गणित तज्ज्ञ शिक्षक राधेश्याम गायधने यांनी मार्गदर्शन करतांना “विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय निश्चित करून यशासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावे” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक साक्षोधन कडबे तसेच विशेष अतिथी राजीव तांदूळकर, दिलीप पवार, सतीश जुननकर, नयन गायधने यांनी मार्गदर्शन केले.
मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरणातून मराठी भाषेचे गोडवे गायले. इयत्ता नववी तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना लेखणी भेट देण्यात आल्या. शाळेचे क्रीडा प्रशिक्षक मनीष राऊत व शुभम सहारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता नववी तर्फे सर्वांना स्नेहभोज देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरविंद दुनेदार, संचालन नीलकंठ पचारे यांनी तर आभार प्रदर्शन अमित मेश्राम यांनी केले. याप्रसंगी शिक्षक प्रशांत पोकळे, शैलेंद्र देशमुख, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, करीना धोटे, शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंदा कोठेकर, लिलाधर तांदूळकर, राशिद शेख आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.