Tuesday, December 24, 2024
HomeSocial Trendingआश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या दिवशी असलेले खंडग्रास चंद्रग्रहण, ग्रहणात करावयाची कर्मे...

आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या दिवशी असलेले खंडग्रास चंद्रग्रहण, ग्रहणात करावयाची कर्मे आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल..!

‘आश्विन पौर्णिमा, २८ आणि २९.१०.२०२३ या दिवशी असणारे चंद्रग्रहण हे भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे. (चंद्राचा केवळ काही भाग पृथ्वीच्या छायेखाली आला, तर खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यालाच इंग्रजीत ‘पार्शल् लूनर् एक्लिप्स्’, असे म्हणतात. ही सावली किती मोठी आहे, तितका त्याचा प्रभाव दिसून येतो. या वेळी चंद्रावर गडद लालसर ते तपकिरी रंगाची छटा दिसून येते.)

१. चंद्रग्रहण दिसणारे प्रदेश

‘हे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंड या प्रदेशांत दिसेल.

२. ग्रहणाचे वेध

अ. हे ग्रहण रात्रीच्या तिसर्‍या प्रहरात असल्याने त्याच्या ३ प्रहर आधी, म्हणजे शनिवारी, २८ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३.१४ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. आ. बाल, वृद्ध, अशक्त आणि आजारी व्यक्ती, तसेच गर्भवती स्त्रिया यांनी शनिवारी सायंकाळी ७.४१ पासून वेध पाळावेत.

इ. वेधामध्ये स्नान, नामजप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग आदी करता येईल. वेधकाळात भोजन करू नये. ई. ग्रहण पर्वकाळात, म्हणजे रात्री १.०५ पासून २.२३ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.

३. चंद्रग्रहणाच्या वेळा (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

३ अ. स्पर्श (आरंभ) : रात्री १.०५ (२८.१०.२०२३ उत्तररात्री १.०५) ३ आ. मध्य : रात्री १.४४ (२८.१०.२०२३ उत्तररात्री १.४४) ३ इ. मोक्ष (शेवट) : रात्री २.२३ (२८.१०.२०२३ उत्तररात्री २.२३) (या वेळा संपूर्ण भारतासाठी असून त्या भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत.) ३ ई. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी) : १ घंटे १८ मिनिटे

टीप १ : पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय.

ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.

४. ग्रहणात कोणती कर्मे करावीत ?

अ. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. आ. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, नामजप, होम आणि दान करावे. इ. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरश्चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंत पटींनी मिळते. ई. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे. उ. एखाद्या व्यक्तीला अशौच असल्यास ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती तिला शुद्धी असते.

५. ग्रहणाचे राशीपरत्वे फल

५ अ. शुभ फल : मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ ५ आ. अशुभ फल : मेष, वृषभ, कन्या आणि मकर ५ इ. मिश्र फल : सिंह, तुला, धनु आणि मीन ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.’

(संदर्भ : दाते पंचांग)

६. कोजागरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण

या वर्षी शनिवार, २८.१०.२०२३ या दिवशी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असून रात्री १.०५ पासून ते २.२३ पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे.

त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी आणि इंद्रदेवता यांचे पूजन करून त्यांना दूध-साखरेचा नैवेद्य दाखवता येईल; मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसर्‍या दिवशी घेता येईल. सौ. प्राजक्ता जोशी, सनातन संस्था ज्योतिष फलित विशारद, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: