Sunday, December 22, 2024
Homeराज्यवीजबिल भरण्यासाठी महावितरणचे तब्बल ६५ टक्के वीजग्राहक ‘ऑनलाइन’...

वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे तब्बल ६५ टक्के वीजग्राहक ‘ऑनलाइन’…

अमरावती – आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत एका क्लिकवर ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे.

उल्लेखनीय म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे.सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत.

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व “महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे.

त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून pस्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त रु. ५००० पेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महावितरणने RTGS /NEFT द्वारे वीजबिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशील वीज बिलावर छापण्यात आलेला आहे.

महावितरणचे उच्चदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहक दरमहा ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करीत असून महावितरणच्या उच्चदाब व लघुदाबाच्या १ कोटी १० लाख ग्राहकांनी एकूण वसुलीच्या रकमेपैकी तब्बल ५ हजार ७५० कोटी रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाखांचा वीजबिलांचा भरणा केला आहे.

त्यानंतर कल्याण परिमंडलातील १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी तर भांडूप परिमंडलामध्ये १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी १००५ कोटी ४१ लाखांच्या बिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. बारामती– १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९.३५ कोटी तर नाशिक – १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे.

लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवरवीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. तरी जास्तीतजास्त ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: