Sunday, November 17, 2024
Homeराज्यअबब…एका जागेकरिता तब्बल १५५ उमेदवार… निवडणूक आयोगाचा डोक्याला हात…ईव्हीएम ला आव्हान…

अबब…एका जागेकरिता तब्बल १५५ उमेदवार… निवडणूक आयोगाचा डोक्याला हात…ईव्हीएम ला आव्हान…

आकोट – संजय आठवले

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या एका जागेकरिता चक्क १५५ उमेदवारांनी नामांकन दाखल केल्याने स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर मारून घेत पारंपारिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविणे करिता तरतूद नसल्याचे सांगून राज्य निवडणूक आयोगाने तूर्तास ही निवडणूक पुढे ढकलली आहे. बेभरवशाच्या ईव्हीएम प्रणालीला आव्हान देणेकरिता गावकऱ्यांनी निवडणूक आयोगाला असे पेचात पाडले असल्याचे बोलले जात आहे.

त्याचे असे झाले कि, मराठवाडा विभागात येणाऱ्या परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याच्या चाटे पिंपळगाव या ग्रामपंचायत मध्ये एका जागेकरिता पोटनिवडणूक लावण्यात आली नामांकन दाखल करणे ते उमेदवारी मागे घेणेपर्यंत सारी प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर निवडणूक लढविण्यास पात्र उमेदवारांची अंतिम यादी लावण्यात आली. ती यादी पाहून मतदारांसह निवडणूक प्रक्रिया राबविणार्‍या अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले गेले.

निवडणूक लढविण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या या यादीत चक्क १५५ उमेदवारांची नावे होती. आयोगाने २८ मार्च २००७ रोजी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु या यंत्रात १५५ नावे बसणे शक्यच नाही. त्यामुळे या पेचातून मार्ग काढणेकरिता जिल्हाधिकारी परभणी यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाला साकडे घातले. त्यावर ही निवडणूक तुर्तास पुढे ढकलण्याचा सल्ला राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी परभणी यांना दिला आहे.

या संदर्भात पाठवलेल्या पत्रात राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्य कृष्णमूर्ती यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना सुचित केले आहे कि, एका बॅलेट युनिटवर अधिकात अधिक १४ उमेदवारांची मतपत्रिका बसविली जाते. त्यानुसार एका वेळेस अधिकात अधिक चार बॅलेट युनिटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे अधिकाधिक केवळ ६० उमेदवारांची मतपत्रिका सेट करता येऊ शकते. त्यामुळे या १५५ उमेदवारांची ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रखद्वारे घेता येणार नाही.

निवडणूक आयोगाने पुढे स्पष्ट केले आहे कि, या निवडणुकीची प्रक्रिया पारंपारिक पद्धतीने अर्थात कागदी मतपत्रिकांचे आधारे घेणे करिता पुरेशा प्रमाणात व मोठ्या आकाराच्या मतपेट्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे तूर्तास ही निवडणूक प्रक्रिया राबविता येणार नाही. याचा अर्थ राज्य निवडणूक आयोगाला आता कागदी मतपत्रिका तयार करून त्यावर शिक्का मारणे ह्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा उबग आल्याने निवडणूक आयोगाला धडा शिकविणेकरिता या गावकऱ्यांनी ही शक्कल लढविली असल्याचे बोलले जात आहे. याच धर्तीवर येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना मूर्ख बनवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक यंत्रप्रणालीला झटका देणेकरिता ३०० ते ५०० उमेदवार उभे करण्याचा विचार समोर येत असल्याची माहिती आहे. असे झाल्यास निवडणुकीतील उमेदवारांना पारखून व तपासून आणि मनाजोगे मत दिल्याची खात्री मतदारांना मिळू शकते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: