Sunday, December 22, 2024
Homeकृषी१ जुलै कृषि दिन आणि वसंतरावजी नाईक जयंतीनिमित्त लेख...

१ जुलै कृषि दिन आणि वसंतरावजी नाईक जयंतीनिमित्त लेख…

शेती आणि शेतकऱ्यांचे कैवारी : वसंतरावजी नाईक

अकोला – संतोषकुमार गवई

आज १ जुलै हरित क्रांतिचे प्रणेते,रोजगार हमी योजनेचे जनक, कृषि विद्यापीठाचे शिल्पकार,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महानायक वसंतरावजी नाईक यांची १११ वी जयंती, महाराष्ट्र शासन अथवा महाराष्ट्रातील तमाम जनता कृषि दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहे.त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याला दिलेला हा संक्षिप्त उजाळा.

शेती आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखल्या जानारे वसंतरावजी नाईक हे केवळ मुख्यमंत्रीच नव्हते; तर, शेतीवेडे मुख्यमंत्री होते. शेती आणि शेतकरी हा त्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळयाचा विषय होता. शेतीचा विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास हे त्यांचे सूत्र होते. साऱ्या जगाचा पोषिन्दा असलेला शेतकरी मेला तर कोणीच वाचणाऱ नाही आणि शेतकरी जगला तर कोणीच मरणार नाही.ही त्यांची धारणा होती.

म्हणून मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती येताच त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने विविध क्रांतिकारी योजनांची आखनी केली. सरकारी यंत्रनेला कार्यप्रवन केले,ग्रामीण भागात सभा घेवून शेतकऱ्यांना विश्वासात घेतले,परंपरागत पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिकतेच्या संदर्भात शास्त्रीय स्वरूपाची नवी दृष्टी दिली,शेतकऱ्यांना काळानुसार बदलण्याची वेगळी दिशा दिली त्यांनी केलेल्या प्रयत्नातुनाच महाराष्ट्रात हरित क्रांतिची बीजे पेरल्या गेली.परिणामः हरित क्रांतिचे प्रणेते म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली.

वसंतरावजी नाईक हे स्वत्तः कृतिशील आणि प्रगत शेतकरी होते. त्यांच्या मते-शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कना असून, शेती हीच साऱ्या उद्योगाची जननी आहे. शेती मोडली तर अर्थव्यवस्था मोडू शकते याची त्याना जाणीव होती म्हणून शेती ही उपजीवीकेचे साधन म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणून केल्या गेली पाहिजे, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित बी-बियानांची, रासायनीक खताची आणि शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानांची माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे,शेती क्षेत्रात नवे-नवे संशोधन झाले पाहिजे, आणि त्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे.

शेती बरोबरच शेतकऱ्यांना जोड़ व्यवसाय करता आले पाहिजे, शेतीच्या उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाट वाढ झाली पाहिजे या उदात हेतुने त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात राहुरी, विदर्भात अकोला, मराठवाड्यात परभणी आणि कोकणात दापोली येथे कृषि विद्यापीठ स्थापना केली. आणि महाराष्ट्राचा विभागीय समतोल साधला. एका राज्यात एका मुख्यमंत्र्यांच्या काळात चार कृषि विद्यापीठे स्थापन होणे ही भारताच्या इतिहासातील पहिली घटना आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या नाईक साहेबांचे नाव आज कृषि विद्यापीठाचे शिल्पकार म्हणून घेतल्या जाते.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात शेतीच्या क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. हे जरी खरे असले तरी 1960 दशकात महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही सींचना अभावी निसर्गाच्या पावसावर अवलंबून होती. पावसाच्या पाण्याची अनियमितता आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात घट होत होती, परिणामः शेतकरी वर्ग हताश होत होता.

कोरड़वाहू शेती जोपर्यंत ओलिताखाली येणार नाही तोपर्यंत शेतीच्या क्षेत्रात आर्थिक समृद्धि येणार नाही,याची कल्पना वसंतरावजी नाईकाना होती म्हणून त्यांनी
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहिम राबविली,शेतकऱ्यांना विहीर खोदण्यास प्रोत्साहन दिले.सिंचनांचे लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प उभारण्याचे कार्य हाती घेतले. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रात जी मोठी धरणे पाहत आहोत त्यापैकी सोलापुर जिल्ह्यातील उजनी महाकाय प्रकल्प,1200 कोटी रुपयाची गुंतवणूक करून मराठवाड़यात उभारलेला महाकाय जायकवाड़ी प्रकल्प, विदर्भाचे भूषण म्हणून ओळखला जाणारा अप्पर वर्धा प्रकल्प,यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती, पेंच,चाप,धोम आदि तब्बल 70 मोठी धरणे वसंतरावजी नाईकांच्या काळात बांधण्यात आली.

अभिमानाची बाब अशी की,नाईक साहेबांनी आपल्या काळात ग्रामीण भागात ज्या लहान लहान पाट बंधाऱ्याची उभारणी केली होती,ती बंधारे आजही ‘वसंत बंधारे’ या नावाने ओळखल्या जात आहे.पाझर तलाव ही तर वसंतरावांचीच संकल्पना होती. कोरडवाहू शेतीला सिंचनांची जोड़ देणाऱ्या वसंतरावजी नाईकांची कारकीर्द निश्चित स्मरणात राहानारी आहे. वसंतरावजी नाईक हे कल्पक बुद्धिचे आणि दूरदृष्टिचे मुख्यमंत्री होते.घरगुती वापराकरिता जशी विज गरजगेची असते तसीच ती उद्योगासाठी गरजेचे असते
या जानीवेतुन त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला गतिमान केले त्यासाठी त्यांनी खापरखेडा, पारस, भुसावळ पोफ़ाळी,येलदरी,परळी इत्यादी ठिकाणी विजनिर्मिति केंद्राची उभारणी केली.

त्यामुळे नवीन-नवीन उद्योगाना चालना तर मिळालीच; पण, ग्रामीण भागात वीज पोहचल्याने शेतकऱ्यांना दुबारा पिक घेता आली. नाईक साहेबांच्या अविरत प्रयत्नामुळे महाराष्ट्राच्या घरा-घरातील काळोख दुर झाला आणि महाराष्ट्रात समृद्धिचा उजेड आला. शेती,पाणी आणि विज या त्रीसूत्रीच्या आधारे महाराष्ट्राच्या काळया मातीचे हिरवे स्वप्न साकार करणारे वसंतरावजी नाईक हे खऱ्या आर्थने शेती आणि शेतकऱ्यांचे कैवारी होते. देशात आज महाराष्ट्राला आधुनिक आणि पुरोगामी राज्य म्हणून जी ओळख निर्माण झाली आहे त्याचे सारे श्रेय महाराष्ट्राच्या विकासाचा महामेरू असलेल्या वसंतरावजी नाईकानाच जाते.आशा या महानायकाला जयंतिनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: