आकोट – संजय आठवले
कोणत्याही निवडणूक कालावधीत गृह जिल्हा असलेले शासकीय अधिकारी यांची अन्यत्र बदली करावी या नियमानुसार आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांची अचलपूर उपविभागीय अधिकारी पदावर बदली करण्यात आली असून त्यांचे रिक्त जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले मनोज लोणारकर यांची वर्णी लावण्यात आली आहे.
गत सात महिन्यांपूर्वीच उपविभागीय अधिकारी म्हणून बळवंतराव अरखराव हे आकोट मुक्कामी डेरेदाखल झाले होते. पण लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने त्यांची कारकीर्द औटघटकेची ठरली आहे. सद्यस्थितीत लोकसभा निवडणूक संदर्भात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या प्रशिक्षणाकरिता अरखराव हे नागपूर येथे गेले होते. ते प्रशिक्षण २ फेब्रुवारीला संपणार होते. ते संपताच त्यांची बदली अचलपूर येथे करण्यात आली आहे. अतिशय शांत संयमी आणि कर्तव्य तत्पर अशी त्यांची कारकीर्द आकोट येथे राहिली आहे. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत त्यांनी लोकप्रियता संपादन केली आहे.
वस्तूत: त्यांचे गाव वाशिम जिल्ह्यात आहे. परंतु त्यांचे वडील अकोला पोलीस विभागात कार्यरत असल्याने त्यांची नोंद अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याच्या राजंदा येथील रहिवासी म्हणून झालेली आहे. त्यामुळे त्यांचा गृह जिल्हा अकोला म्हणून नोंदविल्याने त्यांना अल्पावधीतच आकोट येथील कारकीर्द आटोपती घ्यावी लागली आहे. बदली आदेश येताच बदलीचे ठिकाणी त्वरित रुजू होण्याचाही आदेश असल्याने सोमवार दि.५ फेब्रुवारी रोजी ते अचलपूर येथे रुजू होणार आहेत.
बळवंतराव अरखराव यांचे रिक्त जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले मनोज लोणारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेही आकोट येथे सोमवार दि.५ फेब्रुवारी रोजी रुजू होण्याची शक्यता आहे.