अमरावती – दुर्वास रोकडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरीकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक जेष्ठ नागरिकांनी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणेच सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील वयवर्षे 60 किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निर्धारीत तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल.
तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रूपये 30 हजार इतकी राहील. जेष्ठ नागरिकांनी योजनेची माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे चांदूर रेल्वे रोड, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला याचार पैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुंटुब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे, केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर व योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक राहील.