Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ…

नांदेड – महेंद्र गायकवाड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रत (प्रिंट) अर्ज भरल्यानंतर 2 दिवसात आवश्यक कागदपत्रासह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करणे बंधनकारक आहे.

तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन संबंधित महाविद्यालयाकडे प्राचार्य यांनी सही शिक्क्यासह सात दिवसाच्या आत पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिनांक 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

लाभाचे स्वरूप या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये, प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपये, वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.

या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.

या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.

विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. शासन परिपत्रक 31 ऑक्टोंबर 2023 नुसार विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही.

विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील.

त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल अशी सूचना समाज कल्याण कार्यालयाने दिली आहे. तसेच अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र,त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: