सांगली – ज्योती मोरे
सध्या विविध साखरकारखान्याच्या गळीत हंगामासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली जात आहे. त्याकरिता ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी मालक हे नोटरी कराराच्या आधारे लाखो रुपये ऊस तोडणी करता मुकादम व मजुरांना देत असतात. त्याचबरोबर कारखाना चालू होण्याच्या दरम्यान सदर तोडणी कामगारांच्या टोळ्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी करिता उतरवल्या जातात.
सदर तोडणी कामगारांना दिलेली रक्कम ही ते आपल्या कामातून परतफेड करण्याची प्रचलित पद्धत आहे.गेल्या काही वर्षांपासून काही मुकादम आणि मजूर जाणून-बुजून बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांच्या मोठ्या रकमा उचल करून लोकांची फसवणूक करत आहेत. सदर ट्रक,ट्रॅक्टर मालक मुकादमना व मजुरांना शोधण्यासाठी गेल्यास ते सापडत नाहीत त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही. अनेक वेळा ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचा शोध घेण्यास ट्रक, ट्रॅक्टर मालक गेले असता, त्यांना मारहाणी सारखे प्रकारही घडले आहेत.
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना असे अवाहन करण्यात आले आहे की,गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मुकादम व मजूर यांच्याकडून फसवणूक झाल्यास शेतकरी अथवा वाहन मालकांनी आपल्याकडील सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित पोलीस ठाण्याशी किंवा आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली मध्ये संपर्क साधावा.असे अवाहन करण्यात आले आहे.