मुंबई – गणेश तळेकर
बॉलीवूड सुपरस्टार जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दिशा पटनी यांची “फिट टु फॅब इन न्यू ‘सोफिट'” ची जाहिरात किंवा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कुल’ महेंद्र सिंग धोनीची MYK laticrete cement ची जाहीरात तुम्ही टीव्ही आणि सोशल मिडीयावर पाहिली आहे का?
हो ना! या जाहिरात निर्मितीमध्ये अकोला जिल्ह्यातील आकोटच्या एका अवलियाची महत्वपूर्ण भूमिका आहे. अनुप अशोक गोरे असं त्याच नाव. विदर्भातील संतभूमीत वाढलेला हा हरहुन्नरी मुलगा आता स्वप्ननगरी मुंबईत सिनेसृष्टीत मराठी, बॉलीवूड मधील बड्या कलाकारांसोबत काम करत असून त्याने आपले एक वेगळे विश्व निर्माण केले आहे.
अकोला जिल्ह्यातील आकोट शहरात गोरे घराण्याचे कला व डीजाइनिंग क्षेत्रात मोठे नाव आहे. याच कलासंपन्न गोरे कुटूंबात अनुप चा जन्म झाला. फ्लेक्सचे युग सुरू झालं तेव्हा आकोट शहरात पहिलं फ्लेक्स झळकवणारे हे गोरे कुटूंबियच होते. त्यामुळे अनुपला कला आणि तंत्रज्ञानाचा वारसा घरातूनच मिळाला. घरात कलेची परंपरा असली तरी अनुपचे वडील शिवाजी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक असल्याने शिक्षणाची सक्ती होती.
अनुपने 12वी झाल्यावर इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. मात्र, त्याच काही त्यात मन रमेना शेवटी इंजिनियरिंग अर्धवट सोडून त्याने कला क्षेत्रात येण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी VFX आणि अॅनिमेशनचा पुण्यात एक वर्षांचा डिप्लोमा केला. अर्थात घरच्यांनीही त्याला पाठिंबा दिला. डिप्लोमा पूर्ण झाल्यावर अनुपने रिलायन्स मीडियामध्ये चार वर्ष नोकरी केली. येथे हॉलीवूड विभागात काम केले.
अनेक हॉलीवूड चित्रपटात अनुप यांचे VFX आर्टिस्ट म्हणून नाव आहे. त्यानंतर प्राइम फोकस स्टुडिओ, मुंबई येथे देखील काम केले. त्यानंतर 2016 मध्ये ‘शेगाविचा योगी गजानन’ या चित्रपटासाठी Executive producer, line producer म्हणून त्याने काम पाहिले, विदर्भात हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. आज ही झी टॉकीजला हा चित्रपट पाहायला मिळतो.
नंतर ‘लँडमार्क फिल्म्स’शी तो जोडला गेला. या ठिकाणी काम करताना अनेक बॉलीवूड कलाकारा सोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. याशिवाय लाईन प्रोड्युसर व प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून ‘ वजनदार,” गच्ची’ आदी चित्रपटांची धुरा त्याने सांभाळली. करीयरच्या एका टप्प्यावर अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून त्याने स्वतःची ‘डीजी मॅजिक मीडिया’ ही कंपनी सुरू केली.
या अंतर्गत PR Marketing, Digital Coordination, Film Production, आदी सेवा देण्यास सुरूवात केली. त्याबरोबरच विनोद सातव आणि कुशल कोंडे यांच्या “लिड मीडिया & पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड” कंपनी सोबत ही काम करत आहे.आजवरच्या प्रवासात अनुपने ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मिडियम स्पायसी’, ‘एकदा काय झालं’, ‘कच्चा लिंबू’, ‘शेंटीमेंटल, ‘धर्मवीर’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांच्या डिजिटल co-ordination आणि PR म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
बहुचर्चित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या पीआर मार्केटिंगचे काम केले, जो चित्रपटगृहात हाऊसफुल्ल झाला. तर आगामी ‘’नवरदेव Bsc Agri” चित्रपटासाठी ते डिजिटल कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या पुनीत बालन स्टुडिओ निर्मित ‘जग्गु आणि ज्युलीएट’ या मल्टिस्टारर चित्रपटासाठी Executive Producer म्हणून देखील त्याने काम पाहिलं आहे. या चित्रपटाला संगीतकार ‘अजय अतुल’ यांनी संगीत दिले होते.
अगदी अलिकडचे सांगायच म्हंटल तर ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील ‘चतुर’ ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता ओमी वैद्य यांचा ‘आईच्या गावात,मराठीत बोल’ हा आगामी मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटाची लाईन प्रोड्यूसर म्हणून संपूर्ण जबाबदारी अनुप गोरे याने पार पाडली आहे. हॉलीवूड चित्रपटांचा VFX आर्टिस्ट म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास मराठी, बॉलीवूड मधील ”कार्यकारी निर्माता” या पदापर्यंत पोहोचला आहे.