आकोट – संजय आठवले
पोलीस शिपाई ते मंडळ अधिकारी पदापर्यंतचा आजवरचा प्रवास आकोट भोवतीच करणारे मंडळ अधिकारी निळकंठ नेमाडे हे लाच प्रतिबंधक विभाग, शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस विभाग, आणि विभागीय चौकशीकरिता महसूल विभाग अशा तीन विभागांच्या डायरीत आरोपी म्हणून नोंद असूनही त्यांची आकोट मंडळ अधिकारी म्हणून पदस्थापना झाल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत असून महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांचेवर इतकी मेहरबानी का? अशी पुच्छा होत आहे. या सोबतच अनेक जण यामागील कारणांचा शोधही घेत आहेत.
येऊन जाऊन आकोट तालुक्यातच आपला सेवाकाळ घालविण्याची जिद्द असलेले आकोटचे विद्यमान मंडळ अधिकारी निळकंठ नेमाडे हे अतिशय धूर्त आणि संधी साधू व्यक्तिमत्व. मोठ मोठ्या दार्शनीक गप्पा मारून समोरच्या व्यक्तीला संमोहित करण्यात त्यांचा हातखंडा. कर्तव्य बजावताना विविध कृल्प्त्या लढवून वरिष्ठांना प्रभावित करण्याचे त्यांचे कसब अगदी वाखाणण्याजोगे. असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व १९९१ साली आकोटात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले. पण त्या पदावर त्यांचे मन रमत नसल्याने त्यांनी तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली.
तलाठी म्हणून आकोट तालुक्यातील बळेगाव येथे ते १९९४ मध्ये स्थापित झाले. त्यानंतर आकोट तालुक्यातीलच मुंडगाव येथे सेवा देऊन ते आकोट भाग २ च्या तलाठी पदी रुजू झाले. अगदी पोलिसी खाक्यातच ही कारकीर्द पार पाडल्यावर त्यांना मंडळ अधिकारी म्हणून बढती मिळाली. पदोन्नतीचे ठिकाण म्हणून ते आसेगाव बाजार येथे रुजू झाले. याच काळात त्यांचे कडे चोहट्टा बाजार मंडळाचा प्रभार सोपविण्यात आला.
याच ठिकाणी त्यांनी गोकुळचंद रामधन गोयंका यांचे फेरफारात घोटाळा केला. ज्याची ऊकल २३.११.२०२० मध्ये झाली. याच दरम्यान त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी यांचे आदेशाने उपविभागीय अधिकारी आकोट कार्यालयात अव्वल कारकून म्हणून नेमण्यात आले.
परंतु तत्कालीन उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांचेशी त्यांचे काहीतरी बिनसले म्हणून हिंगे यांनी त्यांची वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यावरून निळकंठ नेमाडे यांचे स्थानांतरण अकोला तालुक्यातील दहीहंडा मंडळात करण्यात आले. या ठिकाणी ते लाच प्रतिबंधक विभागाच्या तावडीत सापडले. परिणामी त्यांना निलंबित करण्यात आले.
निलंबन काळात त्यांची नियुक्ती मुर्तीजापुर तालुक्यात झाली. लगेच सहा महिन्यातच ते बाळापूर तालुक्यातील निंबा मंडळात रुजू झाले. तेथील लोक आजही त्यांच्या तेथील कारकिर्दीला काळी कारकीर्द म्हणून संबोधतात. या काळात अनेक खटपटी करून नेमाडे पुन्हा आकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळात बदलून आले.
याच काळात पणज मंडळाचे मंडळ अधिकारी राजेश बोडखे यांची वर्णी तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांचे दरबारात झाली. त्यामुळे पणज मंडळाचा प्रभार निळकंठ नेमाडे यांचेकडे देण्यात आला. जो आजतागायत कायम आहे. अशा स्थितीत दि.२२.०५.२०२३ रोजी जिल्हाधिकारी अकोला यांचे आदेशाने नेमाडेंची आकोट मंडळ अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
अशा रीतीने आकोट भोवती व आकोट तालुक्यातच आपली कारकीर्द पूर्ण करण्याचा हव्यास असलेले निळकंठ नेमाडे सेवेच्या अखेरच्या टप्प्यात आकोट मुक्कामी देरेदाखल होण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वीतेत आमदार प्रकाश भारसाकळे यांचा सिंहाचा वाटा असल्याची माहितगारात चर्चा आहे. आमदार महोदय यांची रुची असलेल्या काही मामल्यात अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन नेमाडेंनी युद्ध स्तरावर बजावलेली भूमिका पाहता त्या चर्चेत तथ्य असल्याचे जाणवते.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे या आदेशानंतर आकोट तहसील कार्यालयात एक खेळ करण्यात आला आहे. अर्थात या खेळाचे कॅप्टन आमदार भारसाखळेच असल्याचे बोलल्या जात आहे. तो खेळ असा- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशावर तहसीलदार आकोट यांनी एक आदेश काढला. या आदेशात नेमाडेंकडे असलेला पणज मंडळाचा प्रभार एस. एस. साळवे मंडळ अधिकारी आसेगाव बाजार यांचे कडे देण्याचे आदेशित केले आहे.
हा आदेश दि. २४.०५.२०२३ रोजी काढलेला आहे. आज रोजी दीड महिना उलटूनही ना नेमाडे यांनी पणज मंडळाचा प्रभार हस्तांतरित केला ना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्याची अंमलबजावणी केली. इतकेच नाही तर आकोट मंडळाचा पसारा अवाढव्य असल्यावरही नेमाडेंकडे अकोलखेड मंडळाचाही प्रभार कायम ठेवण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे नेमाडेंवर लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. दुसरे म्हणजे धामणा बुजुर्ग येथील गोकुळचंद रामधन गोयंका यांची फसवणूक केल्याप्रकरणी दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांचेवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविलेला आहे. तोही न्यायप्रविष्ठ आहे. यासोबतच महसूल विभागाद्वारे नेमाडेंची विभागीय चौकशीही सुरू आहे.
असे असतानाही नेमाडेंची मंडळ अधिकारी म्हणून आकोट येथे नियुक्ती आणि त्यांचेचकडे पणज व अकोलखेड मंडळाचा देण्यात आलेला प्रभार याने आकोटकर अगदी अचंबित झालेले आहेत. त्यामुळे नेमाडे खरंच इतके कर्तृत्ववान आहेत का? तर याचे उत्तर आहे अजिबात नाही. मग तरीही महसूल विभाग त्यांचेवर इतका मेहरबान का? यात काय गोम आहे? आमदार भारसाखळे हे नेमाडेंना सुरक्षा का देत आहेत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.