महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच…
पातुर – सचिन बारोकार
गेल्या काही महिन्यांपासून पातुर तालुक्यामध्ये महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना एकामागून एक समोर येत आहेत. त्यामुळे तालुक्यात पोलिसांचा वचक राहिलेला नाही असे आता नागरिक खुलेआमपणे बोलायला लागले आहेत.
भर दिवसा मुलींचे विनयभंग व्हायला लागल्याने कायद्याचा वचकच राहिलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पातुर तालुक्यातील अस्तित्व संपलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत काय भूमिका घेतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वीच चान्नी पोलीस स्टेशनमध्ये एक अल्पवयीन मुलीला आरोपी चक्क पोलीस ठाण्यातून फरार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने पोलिसांची नाचक्की झाली. त्यानंतर आठवडाभरापूर्वी नऊ वर्षाच्या एका चिमुकलीवर घराच्या शेजारीच अत्याचार झाल्याची घटना समोर आली.
यापूर्वीसुद्धा मुली व महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना पातुर तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत. या सर्व घटनांनी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगलेली असतांनाही चान्नी पोलिसांचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा भर दिवसा विनयभंग झालेला आहे.
याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केलेली हकीकत अशी की सोमवार दि. 6 जानेवारी रोजी सकाळी आलेगाव पासून जवळच असलेल्या एका गावातील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी काही कामानिमित्ताने आलेगाव येथे गेली होती.
तेथे एका किराणा दुकानात घरून सांगितलेले सामान खरेदी करण्यासाठी ती गेली असता दुकानात उपस्थित असलेल्या व्यक्तीने नाव आणि गाव विचारले. नंतर जात विचारली. त्यानंतर पॅड पाहिजे का म्हणून विचारणा केली. त्यानंतर मुलीने एक किलो साखर मागितली तर दुकानातील व्यक्तीने दोन किलो घेऊन जा म्हणून सांगितले. मुलीने आपल्याला हवे असलेले सामान खरेदी केल्यानंतर दुकानातील व्यक्तीला पाचशे रुपयांची नोट दिली.
तेव्हा त्याने पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा मुलीने त्याला पुन्हा पैसे घेण्याची विनंती केली. तेव्हा दुकानातील व्यक्तीने मुलीकडून पैसे घेतांना तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढले. त्यानंतर पैसे घेऊन उर्वरित पैसे मुलीला परत दिले. मुलगी सामान घेऊन आधार केंद्रावर गेली.
तेथे आधार कार्डाचे काम करून नंतर वाहनाने घरी परतली. दुपारी घरी पोहोचताच ती रडायला लागली. त्यावर तिच्या आईने तिची विचारपूस केली असता तिने सर्व झालेली हकीकत सांगितली. आईने लगेच चान्नी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून संबंधित दुकानातील व्यक्तीविरुद्ध पास्को आणि ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अशोक काळदाते (आलेगाव ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
पातुर तालुक्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत?
भर दिवसा दुकानात सामानासाठी गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग होतो. सायंकाळच्या वेळी घराच्या जवळच खेळणाऱ्या नऊ वर्षीय चिमुकलीवर शेजारच्या घरात अत्याचार होतो. पीडित महिला आरोपीसह पोलीस ठाण्यातून फरार होते आणि त्या पूर्वीच्याही अनेक घटना लक्षात घेता पातुर तालुक्यातील मुली व महिला सुरक्षित नाहीत.
पोलिसांचा वचक नसल्याने मुली व महिलांबाबत वाईट प्रवृत्ती असलेल्या लंपटांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी चान्नी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था चोख कशी ठेवावी याबाबत धडे देण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.