पुण्यातून अटक करण्यात आलेले DRDO चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील न्यायालयात सांगितले की, प्रदीप कुरुलकर हा डीआरडीओच्या अतिथीगृहात काही महिलांना भेटला होता. आणि सध्या एटीएस या गोष्टीचा तपास करत आहे.
मंगळवार, 9 मे रोजी प्रदीप कुरुळकरला पुण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी शास्त्रज्ञाच्या कोठडीत वाढ करण्याचे आवाहन केले. एटीएसचे वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला सांगितले की, DRDO गेस्ट हाऊसचे रेकॉर्ड अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे गेस्ट हाऊसशी संबंधित तपास होऊ शकला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतर तपास अधिकारी गेस्ट हाऊसमधील आरोपींच्या हालचाली तपासतील. या युक्तिवादानंतर न्यायालयाने शास्त्रज्ञाच्या कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ केली.
माहिती पाकिस्तानात जात होती!
४ मे रोजी महाराष्ट्र एटीएसने शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला पुण्यातून अटक केली होती. हनी ट्रॅपमध्ये अडकून त्याने डीआरडीओची गुप्तचर माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप प्रदीप वर आहे. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) यांना पाठवण्यात आली. प्रदीप कुरुलकर हे व्हॉट्सएप कॉल्स आणि व्हॉट्सएप मेसेजद्वारे पीआयओशी जोडले गेले होते, असेही सांगण्यात आले. एटीएसच्या म्हणण्यानुसार, गेम सुरू होण्यापूर्वी, पीआयओशी संबंधित काही हँडलर्सने शास्त्रज्ञाला हनी ट्रॅप केले होते.