Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनमधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची घोषणा, गौरी कालेलकर-चौधरी यांचा पुढाकार...

मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची घोषणा, गौरी कालेलकर-चौधरी यांचा पुढाकार…

मुंबई — गणेश तळेकर

ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्यनिर्माता, चित्रपटनिर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान अमूल्य आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र सिद्धहस्त लेखक अनिल कालेलकर यांनी वडिलांचा कलेचा वारसा पुढे चालवला. हाच वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी मधुसूदन कालेलकर यांची पुढची पिढी आता सज्ज झाली आहे.

त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची घोषणा एका शानदार सोहळ्यात केली आहे. या प्रॉडक्शन्स हाऊसतर्फे आगामी काळात अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांच्या भेटीला येणार आहेत. गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी हे दांपत्य ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या प्रॉडक्शन्स हाऊसची धुरा सांभाळणार आहेत.

हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल याच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. या लोगो अनावरण सोहळ्याला शिवसेना नेते मा.आदित्यजी ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. मधुसूदन कालेलकर यांचे पुत्र आणि ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांनी याप्रसंगी हृद्य आठवणींना उजाळा दिला. गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांची सहनिर्मिती असलेल्या आगामी ‘घरत गणपती’ चित्रपटाची टीम दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, निकिता दत्ता, भूषण प्रधान, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, परी तेलंग, रुपेश बने, राजसी भावे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. तसेच मनोरंजन व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ‘मधुसूदन कालेलकर यांसारख्या महान व्यक्तिमत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणे, हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत राजीव खंडेलवाल यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ ला मनापासून शुभेच्छा दिल्या.

‘प्रत्येक जण स्वतःचा मार्ग निवडत असतात. काहीजण आपल्याला मिळालेला वारसा अभिमानाने आणि आनंदाने पुढे नेतात आज या निमित्ताने गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांनी कलेचा वारसा पुढे नेण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. माझ्या मनापासून शुभेच्छा असल्याचे शिवसेना नेते मा.आदित्यजी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ तर्फे आगामी काळात चित्रपटांची निर्मिती, वेबसिरीज तसेच व्यावसायिक नाटकांची निर्मिती, गीत संगीताचे मनोरंजक कार्यक्रम केले जाणार असून या सगळ्यांची सविस्तर घोषणा लवकरच केली जाणार आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या कलाकृतींनी कित्येक पिढ्यांच्या रसिकांचे भावविश्व व्यापून टाकले. त्यामुळे त्यांचा हा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले. ही जबाबदारी सक्षमपणे पेलत प्रेक्षकांना उत्तम ते देण्याचा मानस असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले.

मराठी-हिंदी चित्रपट लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. २०२३-२०२४ हे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या कारकिर्दीत ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन मधुसूदन कालेलकरांनी केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली.

अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या ‘मधुसूदन कालेलकर’ यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या चौफेर कर्तृत्वाने कलेच्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची पुढची पिढी सज्ज झाली आहे, ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: