Friday, January 31, 2025
Homeराज्यअंजनगावच्या तहसीलदार पुष्पा डाबेराव (सोळंके) यांच्या निलंबनाचे आदेश लवकरच..?

अंजनगावच्या तहसीलदार पुष्पा डाबेराव (सोळंके) यांच्या निलंबनाचे आदेश लवकरच..?

बांगला देशातील नागरिकांना जन्म नोंदीचे आदेश दिल्याबद्दल अमरावती जिल्ह्यातील अंजनगावच्या तहसीलदार पुष्पा डाबेराव (सोळंके) यांच्या निलंबनाचे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे संकेत असून याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचा अंतरिम अहवाल प्राप्त होताच ही कारवाई करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे.

अंजनगाव तहसील कार्यालयातून तब्बल १५०० बांगला देशी नागरिकांना जन्म नोंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्याच आठवड्यात अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेवून दिली आहे.

त्यांनी अंजनगाव तहसील कार्यालयात जावून देखील ह्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली आहे.त्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील अशाप्रकारे तहसीलदारांनी दिलेल्या जन्म नोंदीच्या आदेशांची पडताळणी करण्यासाठी एका एसआयटीची स्थापना करण्यात आलेली असून ही समिती अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण आदेशांची चौकशी करीत आहे.

या समितीने अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी लवकरच अंतरिम अहवाल देण्याविषयी निर्देशित करण्यात आले असून त्यानुसार अकोला जिल्ह्यातील संबंधित तहसीलदार यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे.अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १५,००० जन्म नोंदीचे आदेश देण्यात आले असून सर्वात जास्त आदेश अकोला शहरात देण्यात आले आहेत.त्यांची संख्या जवळपास ४५०० च्या घरात आहे.

किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यानुसार जन्म प्रमाणपत्र वाटल्याची आकडेवारी दिली असून ते म्हणाले,की यवतमाळला १३,५००, अमरावती आणि अकोलामध्ये १५,००० लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. तर अकोला शहरात ४५०० लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावतीमधील अंजनगाव सुर्जीमध्ये २२ हजार मुस्लिमांची संख्या असून त्यात १,४८० बांगलादेशी मुस्लीम आहेत.

बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल नुकतेच मालेगावचे तत्कालीन व सध्य स्थितीत जळगाव जिल्ह्यातील बोडवड येथे कार्यरत असलेले तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार धारणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. मालेगावप्रमाणेच इतर ठिकाणीही आता कारवाई होणार असून काही अधिकाऱ्यांचे निलंबन होणार असल्याचे सुतोवाच सोमय्या यांनी नुकतेच केले आहे.

एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई तर दुसऱ्या बाजूला या बांगलादेशींना परत पाठवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच यापुढे जन्म प्रमाणपत्र देत असताना व्यवस्थित लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.गेल्याच आठवड्यात राज्य शासनाने एक आदेश काढून नव्याने जन्म नोंदीचे आदेश देण्यावर बंदी घातली असून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना तसे सूचित करण्यात आले आहे.

राज्यात थोडेथोडे नव्हे तर दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. २०२४ मध्ये दोन लाख बांगलादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना असे जन्मदाखले देण्यात आले, असल्याचेही त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: