आकोट – संजय आठवले
अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलकांनी सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केल्याने अनेक दिग्गजांनी या फत्तव्याचा धसका घेतला.परंतु आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी मात्र समाजाचा हा आदेश धुडकावून लावीत भूमिपूजनाचा सपाटा लावल्याने संतप्त मराठा युवकांनी त्यांना कार्यक्रम आवरण्याची तंबी दिली.
त्यावर भारसाखळे यांनी एक पाऊल मागे घेऊन आपल्या सोहळ्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. सद्यस्थितीत अख्ख्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडालेला आहे. संतप्त समाज बांधवांनी साऱ्याच राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे. त्याचा सार्यांनीच धसका घेतला आहे.
मात्र गावबंदीचा हा फतवा झुगारून आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी मात्र गावागावात भूमिपूजन व भेटी देण्याचा आणि त्यानिमित्ताने मतांची बेगमी करण्याचा सपाटा लावला आहे. उतार वयात अशा सोहळ्यांच्या आयोजनामागेही मोठे कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. काहीच महिन्यांपूर्वी भाजपने पक्षांतर्गत केलेल्या सर्वे मध्ये आमदार भारसाखळे सपशेल नापास झाले आहेत. याची कणकुण त्यांना संघ मुख्यालयातून दोन महिन्यांपूर्वीच लागली होती.
दोन महिन्यांपूर्वी संघ मुख्यालय रेशीम बाग नागपूर येथे भाजपच्या हिंदुत्ववादी सर्व शाखांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्या ठिकाणी जिल्हा व मतदार संघ निहाय बजरंग दल दुर्गा वाहिनी अशा हिंदुत्ववादी सेलच्या कार्यकर्त्यांसोबत देवेंद्र फडणवीस आणि भाजप राज्य प्रभारी सि.टी. रवी यांनी चर्चा केली.
या चर्चेदरम्यान आकोट तेल्हारा येथील सर्वच कार्यकर्त्यांनी आमदार भारसाखळे यांचेबाबत नाक मुरडले होते. त्यांचा तक्रारीचा पाढा ऐकून फडणवीसही सुन्न झाले होते. सर्व ऐकून घेतल्यावर त्यांनी ह्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देऊन सांगितले कि, “भारसाखळे आता बादच होणार आहेत. तसेही ते संघ विचारांचे नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांची कारकीर्द पूर्ण होईपर्यंत चालवा. नंतर तुम्हालाच तीन नावे द्यायची आहेत. त्यातील नावाचाच विचार केल्या जाईल.”
या वक्तव्याने भारसाखळेंबाबतचे भविष्य स्पष्ट झाले. हा वार्तालाप भारसाखळेंच्याही कानी आला. त्यावरून त्यांनीही जे जाणायचे ते जाणले. त्यानंतर लगेच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा समोर आला. त्यात आपली मंत्रिपदी वर्णी लागावी याकरिता भारसाखळे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिंदे गटासोबत चाललेल्या ओढाताणीची माहिती देऊन भारसाखळे यांची समजूत घातली. “तूर्तास मंत्री पदाचा आग्रह सोडा.
आकोटातून तुमची उमेदवारी पक्की. निवडणुकीनंतरच्या पाच वर्षात तुम्हाला मंत्री करू” असा शब्द फडणवीस यांनी भारसाखळे यांना दिला. परंतु घाट घाट का पानी प्यायलेल्या धुर्त भारसाखळे यांना तो शब्द नसून ते चॉकलेट आहे हे समजले. त्यामुळे तेथून परतल्यावर त्यांनी वंचितकडे खडा टाकलेला आहे.
काँग्रेसलाही त्यांनी डोळे मिचकावले आहेत. परंतु त्यावरही न विसंबता त्यांनी अपक्ष लढण्याचीही तयारी ठेवली आहे. आणि आता तीच बांधणी करण्याकरिता ते जिवाचा आटापिटा करीत आहेत. त्याकरिताच मराठा समाजाने गावबंदी केल्यावरही ते गावोगावी भेटी व सोहळे पार पाडत आहेत.
वास्तविक गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भारसाखळे यांनी मराठा आणि कुणबी यांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला आहे. आताही या दोन समाजावर त्यांची मोठी मदार आहे. त्यामुळे त्यांनी काही काळ आपले सोहळे आवरते घेणे आवश्यक होते. परंतु अपक्ष लढण्याकरिता त्यांना एक क्षणही वाया जाऊ द्यायचा नाही.
म्हणून ते अनावर झालेले आहेत. पण त्यांच्या ह्या वर्तनाने मराठा युवक कमालीचे दुखावले आहेत. त्यांनी भारसाखळे यांना रोखण्याचा मनसुबा केलेला आहे. ही कुणकुण भारसाखळे यांच्या कानी गेली आणि त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन आपले नियोजित सर्व कार्यक्रम तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.