Sunday, December 22, 2024
Homeराज्यनवीन ठाणेदारांना दिली चोरट्यांनी सलामी...प्रसिद्ध व्यवसायी सुरेश मामा बोंडेंच्या घरी चोरीचा असफल...

नवीन ठाणेदारांना दिली चोरट्यांनी सलामी…प्रसिद्ध व्यवसायी सुरेश मामा बोंडेंच्या घरी चोरीचा असफल प्रयास…५ चोरटे कॅमेऱ्यात कैद…जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक सुरेश मामा बोंडे यांचे घरी ५ चोरट्यांनी चोरीचा असफल प्रयास केला असून हे ५ ही जण सीसीटी कॅमेऱ्यात वावरताना दिसत आहेत. शहरात नव्याने आलेल्या ठाणेदारांना चोरट्यांनी ही सलामी दिल्याची चर्चा होत असून या चोरट्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हे चोरटे परप्रांतीय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

घटनेची हकीगत अशी कि, शहरातील व्यावसायिक सुरेश मामा बोंडे हे आपले प्रतिष्ठानातून परत आल्यावर त्यांनी रात्रीचे भोजन व त्यानंतर शतपावली आटोपली. नंतर ते रात्री १ वाजताचे सुमारास झोपी गेले. घरातील सर्व मंडळी तळमजल्यावरच झोपी गेलेली होती. पहिल्या मजल्यावर त्यांचे भाडेकरूही झोपले होते. सकाळी या भाडेकरूला आपल्या शेजारच्या हॉलचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्याने त्वरित ही माहिती मामांचे कानी घातली.

त्यांनी लगेच पहिल्या मजल्यावर जाऊन घराची पाहणी केली असता तुटलेले कुलूप त्यांना आढळले. त्यामुळे रात्री घरात चोरटे घुसले असल्याचा त्यांना संशय आला. त्यावरून त्यांनी आतील खोल्यांची पाहणी केली. तेव्हा त्यांना घरातील सामान अस्तव्यस्त झाल्याचे व घरात असलेल्या अलमारीतील सामानही फेकल्याचे आढळून आले. त्यावर घरात चोर घुसल्याची त्यांना खात्री पटली. त्यावर बारकाईने पाहणी केली असता चोरांनी कोणतेही सामान चोरले नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर घरातील सीसीटी कॅमेऱ्याने टिपलेली रात्रीची चलचित्रे पाहिली असता, सर्वांना धक्का बसला. रात्री सव्वातीन वाजता चे सुमारास घरात घुसलेल्या पाच व्यक्ती त्यात कैद झाल्या होत्या. त्यांचे हालचालीवरून ते २५ ते ३० वर्षे वयोगटातील असल्याचे जाणवत आहे. या पाचही जणांनी आपले चेहरे रुमालाने झाकलेले होते. त्यामुळे त्यांना ओळखता येणे कठीण झाले आहे. मात्र त्यांचे पेहरावावरून ते चोरटे परप्रांतातील असल्याचा कयास लावला जात आहे.

या घटनेची खबर आकोट शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळाची प्राथमिक पाहणी व चौकशी केली असता मामांचे घरी येण्यापूर्वी या चोरट्यांनी मामांचे शेजारी विजय जयस्वाल यांचे घरीही चोरीचा असफल प्रयास केल्याचे लक्षात आले.

उल्लेखनीय बाब म्हणजे गत दोन महिन्यांपूर्वीही जयस्वाल यांचे घरी असाच प्रयास करण्यात आला होता. मात्र पोलिसात त्याची माहिती देण्यात आली नव्हती. परंतु पुन्हा घडलेल्या या घटनेने आकोट परिसरात चोरट्यांचा वावर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे आकोट शहरात नवीन ठाणेदार तपन कोल्हे हे कालच रुजू झाले आहेत. त्यामुळे नवीन ठाणेदारांना चोरट्यांनी सलामी दिल्याचे नागरिकात बोलले जात आहे. परंतु चोरट्यांच्या या आव्हानामुळे जिल्ह्यातील अख्खी पोलीस यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे.

अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याच दरम्यान आकोट शहर पोलिसांनी त्यांचेकडे नोंद असलेल्या निगराणी चोरट्यांची चौकशी करणे सुरू केले आहे.

काहीच दिवसांपूर्वी हिवरखेड बाजारपेठेतील सराफ दुकानांमध्ये अशीच चोरी झाली होती. ते चोरटेही परप्रांतीय असल्याचा संशय आहे. या प्रकरणातील चोरटेही परप्रांतीय असल्याचा संशय आहे. त्यामुळे हिवरखेड प्रकरणाचे धागेदोरे या प्रकरणाशी जुळतात कि काय हे पाहणे गरजेचे आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: