Monday, December 23, 2024
Homeराज्यधातुमिश्रीत मांजा वीज वाहिनीत अडकल्यास होऊ शकते अपघात...

धातुमिश्रीत मांजा वीज वाहिनीत अडकल्यास होऊ शकते अपघात…

वीजतारांपासून दूर पतंग उडवा; महावितरणचे आवाहन

अमरावती – तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणच्या अमरावती परिमंडळ कार्यालयाने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागात विद्युत वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. मात्र पतंग उडवताना या यंत्रणेपासून दूर राहावे. पतंगप्रेमीनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावा. विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. कारण विद्युत वाहिन्यांचे एकमेकावर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते.

घराच्या गच्चीवरून, रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. विद्युत वाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे. धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा. कारण धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात विद्युत प्रवाहीत होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.

metallic manja gets stuck in a power line

तसेच वीज वाहिन्याच्या दोन खांबाच्या मधात वीज वाहिन्यात अडकलेले पतंग काढता येत नाही. त्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत होऊन ,ताराला तारा भिडल्याने होल्टेज वाढू शकते आणि मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. मागील वर्षी यवतमाळ शहरातील महावितरणच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी, कार्यालयीन कामाकरीता मोटर सायकलने जात असतांना नायलोन मांजामुळे त्यांचा गळा चिरून ते गंभीर जखमी झाले होते.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा; जेणेकरून तात्काळ वीजपुरवठा खंडित करून तातडीची मदत करणे सोईचे होईल. महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्राच्या १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. जनसंपर्क अधिकारी महावितरण,अमरावती परिमंडळ

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: