Friday, November 15, 2024
Homeमनोरंजनअमृता खानविलकर साकारणार 'महाराणी येसूबाई भोसले'...

अमृता खानविलकर साकारणार ‘महाराणी येसूबाई भोसले’…

मुंबई – गणेश तळेकर

मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”

शिव स्मरूनी, असुरा मर्दूनी, नटली असे शंभू अस्तुरी,
पिवळा मळवट, भगवी धरणी, सह्याद्रीची शैलपुत्री!

महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सचा भव्य आणि बिग बजेट “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन भागात असणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे पहिल्या पोस्टरने जाहीर झाले आणि आणखी कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमुळे या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ‘महाराणी येसूबाई भोसले’ ही व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिव स्मरूनी, असुरा मर्दूनी, नटली असे शंभू अस्तुरी, पिवळा मळवट, भगवी धरणी, सह्याद्रीची शैलपुत्री! अशा ओळी असलेल्या पोस्टर मध्ये अमृता पिवळी साडी, मराठमोळा साजशृंगार करून हात जोडून शिवलिंगाकडे भक्तिभावाने बघताना दिसते आहे.

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती या महत्त्वाच्या ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्या अभिनयाने अनेक भूमिका संस्मरणीय करणाऱ्या अमृताला ‘महाराणी येसूबाई भोसले’ या भूमिकेत बघणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत बिग बजेट चित्रपट फार कमी प्रमाणात बनतात त्यापैकीच एक “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनकार्याचा पट खूप भव्य आणि साहसी आहे त्यामुळे मोठ्या पडद्यावरसुद्धा तो भव्यदिव्यच दिसला पाहिजे असे निर्मात्यांचे ठाम मत होते.

म्हणूनच या चित्रपटाची निर्मितीमूल्ये ही अतिशय उच्च दर्जाची ठेवताना प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्य चित्रपट पाहण्याचा समृद्ध अनुभव मिळेल अशीच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित आणि संदीप रघुनाथराव मोहितेपाटील प्रस्तुत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहितेपाटील, सौजन्य सूर्यकांतजी निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतनराजे निलेशराव भोसले आहेत तर तुषार विजयराव शेलार यांनी दिग्दर्शन केले आहे तसेच कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहितेपाटील आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे.

“धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: