अमरावतीच्या सुपुत्राने सातासमुद्रापार नाव लौकीक केलं आहे. विकास तातड असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने जागतिक दर्जाच्या कोलंबिया विद्यापीठातून मास्टर्स पदवी प्राप्त केली आहे. या यशाचे पूर्ण श्रेय विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी समाज आणि त्यांच्या कुटुंबीयांना देतात.
विकास यांनी अशोक चक्र असलेला निळा गमछा घातला होता, जो जगभरातून आलेल्या सर्व लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. पहिल्यांदाच बाबासाहेबांचा निळा झेंडा परिधान करून, विकास कोलंबिया विद्यापीठाच्या 2024 च्या दीक्षांत समारंभात आपली पदवी स्वीकारताना दिसले.
अमरावतीच्या भीमनगर झोपडपट्टीतून कोलंबिया विद्यापीठापर्यंतचा प्रवास खूपच कठीण होता, परंतु बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे सर्व अडचणींचा सामना करण्याचे बळ मिळाले, असे विकास सांगतात.
वंचित समुदायातील सर्व विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्च विद्यापीठांत शिक्षण घेतले पाहिजे आणि कुटुंब व समाजाने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत केली पाहिजे, असे विकास यांनी बोलताना सांगितले.