अमरावती,दि.२३ नोव्हेंबर २०२२; महावितरण वरूड उपविभागीय कार्यालयाकडून वरूड शहरासह परिसरातील ९६ ग्राहकांकडे मागील सहा महिन्यात पकडलेल्या वीज चोरीची दंडासहीत ३८ लाख ७९ हजार रूपये वसुल करण्यात आले आहे. शिवाय महावितरण मोर्शी विभागातर्फे वीज चोरी विरोधातली मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोर्शी राजेंद्र मळसणे यांनी दिली आहे.
वरूड उपविभाग १ चे उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या पथकाच्या धाडसत्रात वरूड शहर,राजुरा बाजार, गडेगांव, आमनेर, घोरड, पोरगवान, एकदरा, मोरचुंद, चिंचरगवान,हतूर्णा,वांडली वाडेगाव वाठोडा, सावंगी येथे जुन २०२२ पासुन एकून ९६ वीज चोरीच्या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये ४ लाख ९७ हजार युनिटची वीज चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ३८ लाख ७९ हजार रूपयाची आकारण्यात आलेली वीज चोरी व दंड रक्कम या ग्राहकांकडून भरून घेण्यात आली आहे.
वीज चोरीचे विविध प्रकार :-
वीज चोरी विविध प्रकारे करण्यात येत असली तरी महावितरणने वीज चोरीच्या सर्व क्लुप्त्यांवर आपला फास मजबूत केला आहे..वरूड उपविभाग एक च्या परिसरात करण्यात आलेल्या ९६ वीज चोऱ्यापैकी ३२ ग्राहकांकडून वीज मीटरला मागच्या बाजूने छिद्र पाडत सीटीचा वायर कट करण्यात आला होता. १७ ग्राहकांनी सर्वीस वायरला टॅप करून फेज आणि न्युट्रल बाय पास केले होते. २९ ग्राहकांनी बटनचा वापर करून न्युट्रल बायपास सोबत थ्री पीनचा वापर केला होता,तर १९ ग्राहकांनी घरगुतीच्या नावावर वाणिज्यिक वापर करत असल्याचे समोर आले होते.
वीज चोरीत शिक्षेचे प्रावधान
वीज चोरीमुळे महावितरणला आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागते.शिवाय वीज चोरीमुळे सुरळीत पुरवठ्याला अडथळा निर्माण होत असल्याने महावितरणकडून यापुढे सतत वीज चोरीविरोधात मोहिम राबविण्याचे निर्देश अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी दिले आहे.वीज चोरी हा कायद्याने अपराध असुन तीन वर्षापर्यंत शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. याशिवाय अशा ग्राहकांवर वीज चोरी करण्यात आलेल्या युनिटच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते.प्रति केडब्ल्यूएचपी नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये प्रती किलो वॅट,वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये प्रती किलो वॅट ,तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार रुपये प्रती किलो वॅट दंडात्मक कारवाई म्हणून तडजोडीचे शुल्क आकारण्यात येते.