Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअमरावती | पत्नीने मित्रासोबत गेम रचून माजी सैनिक पतीचा काटा काढला...पत्नीसह चोघे...

अमरावती | पत्नीने मित्रासोबत गेम रचून माजी सैनिक पतीचा काटा काढला…पत्नीसह चोघे अटकेत…

अमरावती: नांदगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कठोरा गांधी रस्त्यावर एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. प्रेमप्रकरणात अडसर ठरलेल्या माजी सैनिक पतीची त्यांच्या पत्नीने कट रचून मित्रांच्याच मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मिलींद वाघ हे अकोला जिल्हयातील खडका येथील रहवासी असून नोकरी निमित्त ते अमरावती येथे स्थायिक झाले होते. ते भारतीय सैन्यातून काही वर्षापुर्वी निवृत्त झाले होते. सद्या ते रेल्वेत नोकरीला होते. मिलिंद सौदागर वाघ (४२) असे मृतकाचे नाव आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी एका महिलेसह ३ युवकांना याप्रकरणी अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मिलिंद हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये उदखेड येथे रेल्वेगेटवर गार्ड म्हणून काम करत होते. त्यांना सेनेची पेन्शन आणि रेल्वेचा पगार होता. परंतु, काही महिन्यांपासून त्यांची पत्नी राहते घर आणि पेन्शन नावाने करून घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत असे. याच कारणांवरून वाद वाढल्याने माजी सैनिकांची पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती. मृतक मिलिंद हे त्यांचा लहान भाऊ प्रशांत सौदागर वाघ (३२) यांच्याशी नेहमी संपर्कात राहत. आपल्या पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत त्यांना सांगत असे.

अशातच १६ पासून एप्रिलपासून मिलिंद यांचा फोन लागत नसल्याने प्रशांत वाघ हे अमरावतीत त्यांच्या घरी आले. सर्वत्र शोध घेऊन ते न दिसल्याने अखेर प्रशांत वाघ यांनी याबाबत गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. गाडगेनगर पोलिसांनी मिलिंद यांची शोधमोहीम सुरू केली. काही दिवसांपूर्वी नांदगावपेठ पोलिसांना कठोरा गांधी मार्गावरील एका शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये अद्यात मृतदेह आढळून आला. प्रशांत यांना मिलिंद यांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यांनी नांदगावपेठ पोलीस स्टेशनमध्ये पत्नीविषयी हत्येची तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक भयानक हत्याकांड समोर आले आहे.

आरोपी महिलेने पेन्शन आणि घर नावाने करून देण्यासाठी आणि त्यानंतर घटस्फोट देण्यासाठी मिलिंद वाघ यांच्याकडे तगादा लावत दबाव निर्माण केला. मिलिंद यांचे दुसऱ्या महिलेसोबत सुत जुळले असून ते तिच्या नावाने पेन्शन करून देवू शकतात, असा संशय आरोपी महिलेला होता. आरोपी संकेत शुभम आणि कार्तिक हे तिघेही नेहमी मिलिंद यांच्यासोबत दारू पित होते. त्यामुळे पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले. १८ एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले. त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करून आकस्मिक मृत्यूचा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला.

या संपूर्ण बाबी तपासात उघड झाल्यावर नांदगावपेठ पोलिसांनी मिलिंद वाघ यांच्या आरोपी पत्नीसह संकेत अशोकराव बोळे (२९), कार्तिक मुरलीधर कडूकर (१९), शुभम देविदास भोयर (१९) यांना ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी कारवाई सुरू करताच आरोपींनी मिलिंद वाघ यांच्या हत्येची कबुली दिली. पत्नी आणि ३ युवक असे चार आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: