अमरावती – अल्पसंख्यांकांच्या गठ्ठा मतांसाठी तत्कालीन उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारने दरोड्याच्या नावाखाली दडपण्याचा प्रयत्न केलेल्या उमेश कोल्हे खून खटल्याला 21 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत असून अमरावतीच्या इतिहासाला काळिमा लावणारे असे प्रकरण पुन्हा घडू नये यासाठी एनआयए दोषींना कठोर शासन करेल असा विश्वास भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी 21 जून रोजी रात्री घंटीघड्याळ जवळ व्हेटरनरी मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने हा खून दरोड्याचा प्रकार असल्याचे सांगून ते दडपण्याचा घाट घातला होता.
सर्वप्रथम भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी उमेश कोल्हे यांचा खून दरोड्याचा प्रकार नसून त्यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली म्हणून झाला असल्याची माहिती उजेडात आणली होती. उद्धव ठाकरे, तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि मविआ यांचा पोलीस प्रशासनावर दबाव होता.
सर तन से जुदा’ चा नारा देत उमेश कोल्हे यांना अमानवीय पद्धतीने मारल्याचा दावा करणारे शिवराय कुळकर्णी यांना देखील अमरावती पोलिसांनी कारवाईची नोटीस देऊन तोंड दाबण्याचा प्रयत्न केला होता. अखेर शिवराय कुळकर्णी यांनीच सर्व प्रथम या प्रकरणाचा तपास एनआयए ने करावा म्हणून पाठपुरावा केला होता.
एनआयए दाखल होताच हे प्रकरण देशभर गाजले. सोबतच सर्व हिंदुत्वावादी संघटना व नेते उतरल्यानंतर उमेश कोल्हे यांच्या खुनाचे कारण दरोडा नसल्याचा निष्कर्ष राज्य सरकारच्या दबावात असलेल्या अमरावती पोलिसांना काढावा लागला होता.
उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास एनआयएने करावा ही मागणी होत असतानाच राज्यात सत्तांतर झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राशी संपर्क साधून एनआयए दाखल होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. या प्रकरणातील अकरा आरोपी अटकेत असून एनआयए ने विशेष कोर्टासमोर चार्जशीट देखील दाखल केली आहे.
उमेश कोल्हे प्रकरणाच्या काही महिने आधी मविआच्याच काळात 12 नोव्हेंबर ला रझा अकादमीने मोर्चा काढून अमरावतीत धुडगूस घातला होता. अमरावतीत जातीय तणाव निर्माण झाल्यावर प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांनी हिंदूंवर आगपाखड करून आपली गठ्ठा व्होट बँक सांभाळण्यासाठी लांगुलचालनाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. क्रमाक्रमाने अमरावती शहर संवेदनशील बनले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अमरावतीच्या जातीय दुरावस्थेला मविआच्या मुस्लिम लांगुलचालनाचे धोरणाच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया दिली. अमरावती विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमांची गठ्ठा व्होट बँक पाहता काँग्रेस नेते व त्यांचे सहकारी पक्ष कायम अनुनयाच्या भूमिकेत असतात.
उमेश कोल्हे प्रकरणात एकाही काँग्रेस नेत्याने तोंड उघडण्याची हिंमत दाखवली नाही. रझा अकादमीच्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते फक्त ‘चाचाजान – मामुजान’ करीत त्याच वस्त्यांमध्ये दिलासा देत फिरत होते, अशी टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली.
उमेश कोल्हे प्रकरणाने अमरावतीचे नाव कलंकित झाले. अमरावती हा देशविरोधी शक्तींचा अड्डा बनू लागल्यागत वातावरण तयार झाले आहे. लव जिहादची अनेक प्रकरणे अमरावतीतच घडले. त्यावरही बोलण्याची मविआची हिंमत नसल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले. अमरावती पाठोपाठ अचलपूर मध्ये दंगा झाला.
धर्मांतरणाच्या बाबतही अमरावती शहराचे नाव बदनाम करण्यात आले. मविआ च्या कार्यकाळात अमरावतीत धार्मिक उच्छाद मांडला गेला. उमेश कोल्हे निर्घृण खून प्रकरणात दोषींना कठोर शासन झाले तरच पुन्हा भविष्यात अशा घटना अमरावतीत घडणार नाहीत. एनआयए मृत उमेश कोल्हे यांच्या आरोपींना कठोर शासन करून न्याय देईल, असा विश्वास देखील शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केला आहे.