Friday, November 22, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | 'लव्ह जिहाद' साठी अपहरणाचा आरोप झालेली 'ती' तरुणी साताऱ्यात सापडली...

अमरावती | ‘लव्ह जिहाद’ साठी अपहरणाचा आरोप झालेली ‘ती’ तरुणी साताऱ्यात सापडली…

अमरावती शहरात गेल्या दोन दिवसांपासून ‘लव जिहाद’ प्रकरण चांगलच गाजत असून काल या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि पोलिसात खडाजंगी सुद्धा बघायला मिळाली, तर ज्या मुलीबद्दल मोठा गोंधळ उडाला ती मुलगी रात्री साताऱ्यात आढळून आल्याने या प्रकरणावर आज शांतता बघायला मिळाली. दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्‍याचे सांगून घरून बेपत्‍ता झालेली १९ वर्षीय तरुणी बुधवारी रात्री उशिरा सातारा सापडल्याने घरच्या मंडळीनी सुटकेचा श्वास सोडला. आज सातारा पोलीस तिला अमरावती येथे घेऊन येत आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.

सदर मुलीला सातारा रेल्‍वे पोलिसांनी गोवा एक्‍स्‍प्रेसमधून ताब्‍यात घेतले. ‘लव्‍ह जिहाद’साठी या तरुणीचे अपहरण करण्‍यात आल्‍याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्‍यांनी बुधवारी या मुद्यावर पोलीस ठाण्‍यात गोंधळही घातला होता. या तरुणीला अमरावतीत आणले जात आहे. येथील रुक्मिणी नगराजवळील हमालपुर्यात राहणारी ही तरुणी बेपत्‍ता झाल्‍यानंतर तिच्‍या वडिलांनी पोलिसांत तक्रारदाखल केली होती. एका विशिष्‍ट समुदायातील युवकाने तरुणीचे अपहरण केल्‍याचा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला होता. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयित युवकाला ताब्‍यात घेऊन चौकशी सुरू केली होती, पण युवकाने आपण अपहरण केले नसल्‍याचे सांगितले.

बुधवारी खासदार नवनीत राणा यांनी येथील राजापेठ पोलीस ठाण्‍यात धडक दिली आणि बेपत्‍ता तरुणीचा तत्‍काळ शोध घ्‍यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. या दरम्‍यान, त्‍यांनी आपले मोबाईलवरील संभाषण पोलीस निरीक्षकांनी ध्‍वनिमुद्रित केल्‍याचा आरोप करीत संताप व्‍यक्‍त केला होता. त्‍यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण तापले होते.या घटनेची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना समजताच त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. युवतीचा शोध घेण्याची मागणी करीत त्यांनी ठाण्याच्या परिसरात ठिय्या आंदोलनही केले होते.

बेपत्ता तरुणीचा शोध घेऊन तिला सुरक्षितरीत्या परत अमरावतीत आणण्याच्या पोलिसांच्या कृतीबद्दल शिवराय कुळकर्णी यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि पोलीस यंत्रणेचे अभिनंदन केले. या प्रकरणातील तथ्य बाहेर येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण – हमालपुरा परिसरारील 19 वर्षीय युवती दोन दिवसांपूर्वी मुस्लिम युवकासोबत पळून गेल्याची चर्चा होती. याबाबत राजापेठ पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी तक्रार दिली असता पोलिसांनी तिला पळवून नेणाऱ्या मुस्लिम युवकाला ताब्यात घेतले. दरम्यान त्या युवकाची कसून चौकशी करून पोलिसांनी ती युवती साताऱ्याला असल्याची माहिती काढली. दरम्यान अमरावती पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधून त्या युवतीशी संपर्क साधला. सध्या ती युवती सातारा पोलिसांच्या निगराणीत असून आज तिला अमरावतीत आणले जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: