अमरावती : मेळघाटात भंगार बसेसचा पुन्हा प्रत्यय आला आहे. या मार्गाने चालणाऱ्या एसटी बसेसची अवस्था अतिशय दयनीय असून रोज काही न काही अपघात घडतात. तर आता शासकीय कन्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या बसचा घाटातच गियर तुटल्याने चालू बस काही मीटर अंतर कापून मागे गेली, परंतु ती शेतातील झुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, दोन मुलींनी बसमधून उड्या घेतल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या.
परतवाडा आगारातून मानव विकास या योजनेची बस परतवाडा वरून परसापूर, बोराळा, मोरगड, टेम्बुसोडा, जामली, वस्तापूर, देवगाव व परतवाडा, असा रोज सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन प्रवास करते. परंतु आज टेम्बुसोडावरून जामलीकडे शाळेतील ५० विद्याथ्यांना घेऊन येत असताना एमएच ४० एन ८०८५ क्रमांकाच्या बसचा घाटातच गियर तुटला. त्यामुळे ही बस २०० मीटर मागे गेली. यात काहींनी मुलींना बसमधून उड्या टाकायला सांगितले व दोन मुलीनी चालत्या बसमधून उड्या टाकल्या. यात त्या मुली किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही.