अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय युवकाने घराशेजारी राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीला दारु पिवून शिवीगाळ करु नकोस, असे म्हटले असता त्याने या ३२ वर्षीय युवकाला शिवीगाळ करुन त्याच्या कानाला चावा घेऊन कानच तोडला. ही धक्कादायक घटना २५ ऑगस्टला सायंकाळी घडली.
या प्रकरणी जखमीने दिलेल्या तक्रारीवरुन गुरूवारी उशिरा रात्री ४४ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगेश ऊर्फ उमेश सुखदेवराव जोंधळे (३२, रा. आसेगाव पूर्णा) असे जखमी तरुणाचे तर नंदू रामराव राठोड (४४ रा. आसेगाव पूर्णा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिस तक्रारीनुसार, नंदू राठोड आणि मंगेश जोंधळे हे एकमेकांच्या घरा शेजारी राहतात. नंदू राठोड हा दारु पितो व त्यानंतर शिवीगाळ करतो, अशी त्याला सवय आहे. २५ ऑगस्टला सायंकाळी मंगेश जोंधळे यांनी नंदू राठोडला दारु पिवू नकोस, शिवीगाळ करु नकोस, असे समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नंदूने मंगेशला जातीवाचक शिविगाळ केली तसेच एखाद्या दिवशी तुला पाहतोच, अशी धमकी दिली. इतक्यावरच नंदू राठोड थांबला नाही तर त्याने थांब तुला सांगतो, असे म्हणून मंगेश यांच्या उजव्या कानाचा चावा घेवून कानच तोडून टाकला. मंगेश यांनी तातडीने आसेगाव पोलिस ठाणे गाठून नंदू राठोडविरुद्ध तक्रार दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी एट्रासिटी कायद्यासह मारहाण करुन दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.