Amravati अमरावती शहरातील गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नसून आज शहरातील पठाण चौक परिसरालगत असणाऱ्या चारा बाजारात दोन गटात झालेल्या भांडणामुळे अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एका १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सदर घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत 5 वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. जखमी मुलीला इर्विन रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून परिसरात दोन युवकांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन गट समोरासमोर आले. तेव्हा एका युवकावर काही लोकांनी तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभारी जखमी झाला. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील अनेक जण रस्त्यावर उतरले होते. दोन गटात हाणामारी सुरू झाली असताना एका व्यक्तीने यावेळी गोळीबार केला.
सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास या परिसरात असणारी शाळा सुटल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी जमली होती, तर 13 वर्षीय विद्यार्थिनी 15 ऑगस्ट निमित्त कार्यक्रम आटोपून आपल्या मोठ्या बहिणीसोबत शाळेतून येत असताना, हैदरपुरा चौकात आली असता एक गोळी तिच्या पायाला लागल्याने ती जागीच कोसळली. यावेळी परिसरातील लोकांनी धाव घेवून तिला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात भरती केले.
घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. गोळीबारात चिमुकली जखमी झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त आरती सिंग पठाण चौक परिसरात दाखल झाल्या. या परिसरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.