अमरावती : राज्यात APMC निवडणुकीचे वेगवेगळे कल बघायला मिळाले मात्र अमरावती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व अठराही उमेदवार विजयी झाले असून विरोधात असणाऱ्या आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनल चा पुरता धुवा उडाला आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
या विजयावर प्रतिक्रिया देताना जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि दिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी हनुमान चालीसा आणि चांदीची नाणी या निवडणुकीत चालली नाही असे म्हटले आहे. शेतकऱ्यांचे हित नेमके कशात आहे याबाबत भाजपला काही एक कळत नसल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा सर्वत्र पराभव झाला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमच्या विरोधकांनी जागोजागी हनुमान चालीसाचे पठण केले चांदीच्या नाण्यांचे वाटप केले पैसाही वाटला मात्र शेतकऱ्यांनी त्यांचा दारुण पराभव केला असे देखील आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांचे शेतकरी पॅनल निवडणूक रिंगणात होते. आमदार रवी राणा यांचे सखे मोठे भाऊ सुनील राणा हे या निवडणुकीत उमेदवार असताना आमदार राणा यांच्या पॅनल मधील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल स्पष्ट झाल्यावर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी आमदार संजय बंड यांचे छायाचित्र असणारे पोस्टर घेऊन शिवसैनिकांनी जल्लोष केला. आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस आणि शिवसेनेचा झेंडा हातात धरून विजयाचा आनंद साजरा केला. काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी होते.