अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जीवनपुरा येथील रहिवासी असलेले प्रहारचे पदाधिकारी, माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्यात जेवणातून तब्बल दीडशे लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणानंतर जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांना मळमळ, उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या सर्व नागरिकांना उपचारासाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाहुण्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अचलपूरच्या जीवनपुरा येथील रहिवासी अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. अनिल पिंपळे हे माजी नगरसेवक आहेत, तसेच ते प्रहारचे पदाधिकारी देखील आहेत. त्यामुळे या साखरपुड्याला नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर नागरिकांनी जेवण केलं. मात्र थोड्याचवेळात त्यांना मळमळ, उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील काही जणांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साखरपुड्यासाठी आलेल्या नागरिकांना जेवणानंतर अचानक मळमळ, उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानं या घटनेत कोणीही जीवितहानी झाली नसून, आता सर्वंची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात 52 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मुरले यांनी दिली आहे.