अमरावती : वलगाव येथील शिराळा रस्त्यावरील चांदूर बाजार मधून पैसे गोळा करून परतणाऱ्या ग्राहक केंद्राच्या कर्मचाऱ्याला अडवून त्यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवून 3 लाख 40 हजार रुपये लुटून पळ काढला. याप्रकरणी विशाल रमेशराव वाघमारे (वय 32, रा. देवरा) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवरा येथील विशाल वाघमारे हा चांदूर बाजारातील बँक ऑफ बडोदा अंतर्गत ग्राहक केंद्रात वसुलीचे काम करतो. दररोज प्रमाणे मंगळवारी रात्री 11 वाजता ग्राहक केंद्र बंद करून 3 लाख 40 हजार रुपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून घराकडे जात होते. मात्र रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी विशालचा रस्ता अडवून शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून धमकावणे सुरू केले. त्यांनी विशाल यांच्याकडील 3 लाख 40 हजार रुपयांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
विशाल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून वलगाव पोलिसांनी तीन फरार दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात व्यस्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वलगाव आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री झालेल्या दोन्ही दरोड्याच्या घटनांमध्ये एकाच आरोपीवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी डीबी स्क्वॉड, सीआययू आणि गुन्हे शाखा पोलिसांची तीन पथके तपासात गुंतली आहेत.