Tuesday, January 7, 2025
Homeगुन्हेगारीअमिनापुर स्मशानभूमीवर माती चोरांचा डल्ला… हजारो ब्रास अवैध उत्खनन…महसूल विभागाची कारवाई…६ ट्रीपर,...

अमिनापुर स्मशानभूमीवर माती चोरांचा डल्ला… हजारो ब्रास अवैध उत्खनन…महसूल विभागाची कारवाई…६ ट्रीपर, १ पोकलेन जप्त…आमदार भारसाखळेंचा हस्तक्षेप..?

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळ व मुंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्राम अमीनापूर येथील स्मशानभूमीवर माती चोरांनी डल्ला मारून येथील हजारो ब्रास मातीची चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन माती चोरी करणारे ६ ट्रिपर व १ पोकलेन जप्त केले आहेत.

या वाहनांना आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले असून यासंदर्भात महसूल विभागाकडून दंडनीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या साऱ्या घटनाक्रमादरम्यान आमदार भारसाकळे यांचे कडून प्रकरण निस्तरण्याकरिता अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

सद्यस्थितीत आकोट तालुक्यातील वारुळा ते तेल्हारा मार्गाचे काम सुरू आहे. ह्या कामाकरिता कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू आहे. त्याकरिता कंत्राटदाराने जिल्हा खनिकर्म विभागाची परवानगी काढली आहे. त्यानुसार कंत्राटदाराकडून वारुळा ते तेल्हारा मार्गालगतच्या नदी नाल्यातून हजारो ब्रास मातीचे उत्खनन केलेले आहे. मात्र एकाही ठिकाणी नियमानुसार उत्खनन केलेले नाही. प्रत्येक ठिकाणी खनिकर्म विभागाच्या अटी व शर्तींना धाब्यावर बसविण्यात आले आहे.

खणीकर्म विभागाचे परवानगी नंतर उत्खनन करावयाच्या जागेचे सीमांकन केल्याखेरीज उत्खनन करता येत नाही. परंतु कंत्राटदाराने असे सीमांकन कुठेही केलेले नाही. कोणतेही उत्खनन २ मीटर अर्थात ६ फुटांपेक्षा अधिक करता येत नाही. मात्र प्रत्येक ठिकाणी १० ते १५ फुटांपर्यंत उत्खनन केलेले आहे. परवानापत्रात दिलेल्या लांबी रुंदीच्या कितीतरी अधिक उत्खनन केले आहे.

नियमानुसार ज्या ठिकाणचे उत्खनन पूर्ण झाले, त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा जलसंधारण अधिकारी व मृद व जलसंधारण विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणांनी या उत्खननाचे मोजमाप करणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्याही ठिकाणी अशी कारवाई केलेली नाही. उलट काही उचल्या ग्रामस्थांनी कंत्राटदाराचे बेकायदेशीर कृत्यास पूर्ण समर्थन दिलेले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या उचल्या ग्रामस्थांनी कंत्राटदाराशी संगनमत करून या उत्खननातील माती गावात विकण्याचाही पराक्रम केलेला आहे.
अशा स्थितीत वारुळा ते तेल्हारा मार्ग बनविणाऱ्या सुधीर कन्स्ट्रक्शनचा संचालक किशोर गायकवाड याने अशाच काही उचल्या ग्रामस्थांच्या भरोशावर उमरा महसूल मंडळातील ग्रामपंचायत मुंडगाव मध्ये येणाऱ्या अमिनापूर येथील चक्क स्मशानभूमीच्या जागेवर उत्खनन सुरू केले. या ठिकाणी ८ फूट खोल, २६ फूट लांब व १७ फूट रुंद खड्डा खोदण्यात आला. या उत्खननाने स्मशानभूमीची जागा अतिशय अडचणीत आली. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी ही खबर मंडळ अधिकारी चौबे व तलाठी आशेर परमार्थ यांना दिली.

त्यावर त्यांनी सुरक्षारक्षक विवेक हिंगणकर यांचेसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी ६ ट्रिपर एम एच २० ई एल ३३१२, एम एच १२ आरपी ३१६६, एम एच २० इजी ८५४३, एम एच २० ई एल ३१६६, एम एच १५ एफ व्ही ०९६५, एम एच २० ई जी ९९१२ आणि एक पोकलेन उत्खनन व वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. ते अवलोकन करून ह्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास जिल्हा खनीकर्म विभागाचा परवाना मागितला. परंतु त्याचेकडे हा परवाना नव्हता.

त्यामुळे हे उत्खनन अवैधपणे होत असल्याचे स्पष्ट झाले. म्हणून या अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील बाळकृष्ण भगवार यांचे समक्ष पंचनामा कार्यवाही सुरू केली. त्याच दरम्यान आमदार प्रकाश भारसाकळे यांचे कडून ह्या कामी हस्तक्षेप केला गेल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आमदारांनी ह्या प्रकरणी कोणतीही कार्यवाही न करण्याची या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे लोक बोलत आहेत. ह्याच हस्तक्षेपाने अर्ध्या तासाच्या कार्यवाहीस जवळजवळ ४ ते ५ तास उशीर झाला.

अखेरीस आकोट येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी याप्रकरणी रीतसर कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानंतर ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली. आता तहसील कार्यालयाद्वारे संबंधितांचे जाबजबाब झाल्यानंतर हे प्रकरण बळवंतराव अरखराव उपविभागीय अधिकारी आकोट यांचे समक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यावर त्यांनी दंडनीय कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

परंतु या कार्यवाहीच्या प्रारंभीच आमदारांनी हस्तक्षेप केल्याने ही दंडनिय कार्यवाही वस्तुनिष्ठच होईल, याबाबत शंका घेतली जात आहे. त्यातच हा प्रकार चोरीचा आहे. त्यामुळे अवैध उत्खननापोटी दंडनीय कार्यवाही झाली तरी चोरीचा अपराध मात्र नष्ट होत नाही. त्याकरिता चोरीची तक्रार पोलिसात देणे आवश्यक आहे. परंतु राजकीय दबावापोटी ही कार्यवाही टाळण्यात येईल असेही बोलले जात आहे. त्यामुळे याप्रकरणी नेमके काय घडते याकडे लक्ष लागले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: