मूर्तिजापूर येथील श्री.डॉ. आर. जी.राठोड महाविद्यालय, मुर्तीजापुर येथे इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर सी.ई.ओ. विल पावर ग्रुप वॉशिंग्टन डी.सी.चे विल हॅरीस यांचे आंतरराष्ट्रीय समिट आणि ग्रामगीता यावर आधारित ”आजची ग्रामगीता तुम्हाला भविष्यात कशी मदत करू शकते ? ” या विषयावर उत्साहात व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गो. रा. शि.प्र.मंडळ दहातोंडा च्या अध्यक्षा श्रीमती दमयंतीबाई आर. राठोड ह्या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. पी. चर्जन तसेच डॉ.ए.एस.निमकर हे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय व्याख्याते विल हॅरीस यांनी ग्रामगीतेचे महत्व व प्रत्येकाला ग्रामगीता आयुष्यात कशी मदत करू शकते ?
हे सखोल मार्गदर्शन करून सांगितले.त्यांनी आपल्या अनोख्या शैलीने हसत खेळत,कधी विनोद करत उपस्थित विद्यार्थ्यांची, मान्यवरांची मने जिंकली.त्यांनी सांगितले आयुष्यात संपत्तीपेक्षा मनाचा मोठेपणा महत्त्वाचा आहे. जीवनात इतरांसाठी काही करावं ही भावना महत्त्वाची आहे.
त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दमयंतीबाई राठोड यांच्या कार्याची स्तुती करून त्यांना आधुनिक संतांची उपमा देखील दिली. विल हॅरीस यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना मी तुमच्यातलाच एक असून आपण सगळे एक आहोत ही सद्भावना व्यक्त केली आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती वाढविण्यासाठी “विल पावर…विल पावर ” हा संदेश देखील दिला. ”
वुई आर वन ” या संदेशाने देखील विद्यार्थ्यांमध्ये एकतेचा संदेश रुजवण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थ्यांना त्यांची भाषा समजावी म्हणून येथे ट्रान्सलेटर म्हणून विल पावर ग्रुप इंडियाचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर शुभम नागपुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी मुर्तिजापूर येथील नामवंत डॉ.मेहरे, डॉ.बायस्कर,डॉ. श्रीमती चावके,डॉ. अवघाते डॉ. नागपुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डॉ.ए.एस. निमकर यांनी केले,तर कार्यक्रमाचे बहारदार संचालन डॉ.एस. के. शाह यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती दमयंतीबाई राठोड, सचिव मा.डॉ.ए.आर.राठोड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. चर्जन यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.