Thursday, September 12, 2024
spot_img
Homeराज्यस्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप - रमेश चेन्नीथला...

स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप – रमेश चेन्नीथला…

अमरावती – दुर्वास रोकडे

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना निर्णय मुंबईत बसून घेतले जाणार नाही तर स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज अमरावती दिली. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुक अमरावती जिल्हा पूर्वतयारी आढावा बैठक अमरावती येथील ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. माजी मंत्री आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन केल्याबाबत काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जिल्ह्याच्या नेत्या ॲड. यशोमती ठाकूर, बबलू भाऊ देशमुख यांच्यासह संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, अमरावती जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा गड राहिला असून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे सर्व छोटे-मोठे मतभेद विसरून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जावे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हा राज्यात मोठा पक्ष झाला आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असून महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या असून त्या ठिकाणी कृषी मंत्री असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज्यातील सत्ताधारी सरकार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेत येईल असा दावा यावेळी चेन्नीथला यांनी केला.

यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला जिल्हा आहे मधल्या काळात काही अडचणी निश्चित आल्या होत्या पण आता पुन्हा एकदा काँग्रेसने आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे आगामी काळात अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसला जास्तीत जास्त मदत निश्चित मिळेल त्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख तसेच माजी पालकमंत्री सुनील भाऊ देशमुख, वीरेंद्र भाऊ जगताप यांचे सहकार्य निश्चित लाभत आहे.

काँग्रेसने नेहमीच सर्वधर्मसमभाव राखण्याचे धोरण अवलंबिले आहे शेतकऱ्यांच्या मागे आपण सातत्याने उभे आहोत, अमरावती जिल्हा आणि विदर्भात पक्षाने जास्तीत जास्त महिलांना संधी द्यावी अशी विनंती यावेळी ॲड.ठाकूर यांनी केली. तर लाडकी बहीण योजनेचे एकीकडे आमिष आमच्या महिला भगिनींना दाखवले जात आहे तर दुसरीकडे त्यांना पैसे परत घेण्याची धमकीही सत्ताधारी पक्षातील काही आमदार देत आहेत. मात्र, ही योजना सरकारची आहे हा पैसा जनतेचा आहे कोणीही उठून आमच्या माय भगिनींना अशा पद्धतीने धमकी दिलेली आम्ही चालवून घेणार नाही आणि यापुढे त्याला निश्चितच उत्तर दिले जाईल असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात सध्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न महत्त्वाचा नाही. तर त्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि धर्माचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र वाचवणं हे काँग्रेसला अत्यंत महत्त्वाचं वाटत असून महाविकास आघाडीमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री निवडून आणू शकतो लोकशाही पद्धतीने आमदारांमधून मुख्यमंत्री निवडला जाईल. त्यामुळे आम्हाला मीडियातले मुख्यमंत्री नकोत अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी पटोले यांनी व्यक्त केली.

या बैठकीला मा.श्री. रमेशजी चेन्निथलाजी ( प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ) , मा. नाना पटोलेजी ( प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ) , मा. विजय वडेट्टीवार ( विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा ) , मा‌. बाळासाहेब थोरात ( माजी महसूलमंत्री महाराष्ट्र ) , खासदार प्रतिभाताई धनोरकर , ॲड. यशोमतीताई ठाकूर ( माजी महिला व बालविकास मंत्री तथा माजी पालकमंत्री अमरावती ) , मा. मुकूलजी वासनिक, मा. आमदार सत्यजित उर्फ बंटी पाटील , मा. बबलूभाऊ देशमुख ( जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण ) , मा. सुनीलभाऊ देशमुख ( माजी पालकमंत्री अमरावती ) , मा. वीरेंद्रभाऊ जगताप ( माजी आमदार ) तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते आणि पत्रकार , वृत्त प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: