आकोट – संजय आठवले
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पदभार ग्रहण केलेल्या आकोट शहर भाजपा अध्यक्षांचा आमदार भारसाखळे यांनी अत्यंत दुस्वास केल्याने या अध्यक्षास अगतिक होऊन पदभार सोडावा लागला असून त्याची कारकीर्द ईन मिन तिन महिन्यांच्या औट घटकेची ठरली आहे. यापूर्वी संधी दिल्यावरही या रिक्त स्थानी पुन्हा हिंदी भाषिक इसमासच दुबार संधी दिल्याने आमदार भारसाखळे यांचा ओबीसींवरचा राग उघड झाला आहे.
परिणामी पदभार सोडलेल्या अध्यक्षाच्या जात समूहात हा त्यांचा अपमान असल्याची धारणा पसरली आहे. त्याखेरीज शहर भाजपातील अन्य ओबीसी कार्यकर्त्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे उचित वेळ आल्यावर आमदार भारसाखळे यांचे कडून या अपमानाचा बदला घेण्याचा या लोकांचा मानस असल्याची माहिती आहे.
प्रकाश भारसाखळे हे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून येतेवेळी आकोट शहर भाजप अध्यक्षपदी भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ता कनक कोटक हे कार्यरत होते. अत्यंत सुस्वभावी आणि मन मिळाऊ नेता म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. या पदावर ते बराच काळ राहिल्याने त्या ठिकाणी खांदेपालट करण्यात आली. तितकाच कर्मठ आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून विलास बोडखे या युवकाची अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली.
विशेष म्हणजे हा युवक आमदार भारसाखळे यांच्या अगदी जवळचा म्हणून त्याची ओळख होती. त्यामुळे भारसाखळे यांनी एका सामान्य परंतु निष्ठावान कार्यकर्त्याला अध्यक्ष पद दिल्याचे भाजपातील साऱ्यांनाच कौतुक वाटले. परंतु बोडखे अध्यक्ष होताच कार्यकर्त्यांना फक्त वापरून घेण्याचा भारसाखळे यांचा जातीयवादी स्वभाव उफाळून आला. आणि अवघ्या काही दिवसातच त्यांच्या नजरेत विलास बोडखे खूपायला लागले.
अतिशय कर्मठ आणि तडफदार असला तरी विलास बोडखे हा कार्यकर्ता आर्थिक बाबतीत मात्र दुबळा आहे. अशा स्थितीत आमदार भारसाखळे हे सत्ताधारी आमदार असल्याने ही कसर भरून काढणे त्यांना फारसे अवघड नव्हते. त्यातच हा अध्यक्ष त्यांच्या जवळचा मानला जात होता. त्यामुळे पक्षीय कार्याकरिता त्याला आर्थिक रसद पुरविणे हा त्यांचा नैतिक जिम्मा होता. परंतु संकुचित वृत्तीच्या भारसाखळे यांनी बोडखे यांना काडीचीही मदत केली नाही.
एखाद्या कार्यक्रमाकरिता वाहने देणे, पक्षीय कार्यक्रमाचे बॅनर्स लावणे, पत्रके वितरित करणे हा सारा खर्च बोडखे यांचेच बोकांडी मारण्यात आला. ही झळ सहन न झाल्याने बोडखे यांनी आमदार भारसाखळे यांच्याकडे गार्हाणे केले. त्यावर अतिशय तुटकपणे “भाऊ तुम्ही अध्यक्ष आहात. आता तुमचे तुम्ही पहा” असे उत्तर मिळाले.
वास्तविक आमदार भारसाखळे स्वतःचे कार्यक्रम आयोजित करतात. त्याकरिता पैसा कसा? आणि कुठून? उभा करतात हे साऱ्याच जाणकारांना ठाऊक आहे. त्याचप्रमाणे विकास कामांची उद्घाटने करणेकरिता, त्यांच्या जाहिराती देणेकरिता बॅनर्स लावणेकरीता ते कुणाकुणास वेठीस धरतात याची पारायणे संबंधित कामांच्या कंत्राटदारांकडून ऐकावयास मिळतात.
त्यामुळे पक्षीय कामाकरिता बोडखे यांना आर्थिक सहकार्य करणे भारसाखळे यांचे करिता जराही कठीण नव्हते. परंतु कशाचेही श्रेय स्वतःखेरीज कुणालाही मिळून देणेकरिता भारसाखळे अतिदक्ष असतात. त्यामुळे आणि कामे करून बोडखे यांनी पक्षात स्वतःचे स्थान निर्माण करू नये याकरिता भारसाखळे यांनी विलास बोडखे यांना त्रस्त केले.
येथे उल्लेखनीय आहे कि, पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत साऱ्यांवर भारसाखळे यांची बारीक नजर असते. इतकी की एखाद्या कामानिमित्य एखादा कार्यकर्ता मुंबईस गेला तर तो परतल्यावर दुसऱ्याच दिवशी भारसाखळे त्याला “काय भाऊ तुम्ही तर एकटेच मुंबईला गेले होते” असे म्हणून “मला का विचारले नाही” असा प्रश्न नजरेनेच करतात. असा अप्रत्यक्ष दबाव आणून लहान कार्यकर्त्याला मोठे न होऊ देण्याच्या खुनशी स्वभावामुळे भारसाखळे यांचे बाबत शहर भाजपात मोठा रोष आहे. याची त्यांनाही कल्पना आहे. तरीही ते कुणाचीच पर्वा करीत नाहीत. त्यामुळेच त्यांनी कधीकाळी आपला निकटस्थ असलेल्या विलास बोडखे यांची उपेक्षा करणे सुरू केले.
परिणामी भारसाखळे यांचे जाचाने उद्विग्न झालेल्या विलास बोडखे यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास अगतीक व्हावे लागले. त्यावरून बोध घेऊन त्यांचे रिक्त स्थानी भारसाखळे यांनी तितकेच निष्ठावान आणि कर्तबगार कार्यकर्ता योगेश नाठे यांची नियुक्ती करावयास हवी होती. परंतु बारी समाजाची शिसारी आल्यागत त्यांनी बोडखे यांचे जागी हरीश टावरी ह्या हिंदी भाषिक व्यक्तीची नियुक्ती करविली.
अशी नियुक्ती करू नये असे अजिबात नाही. परंतु तीन महिन्यांपूर्वी अध्यक्ष केलेल्या विलास बोडखे यांचे आधी कनक कोटक हे हिंदी भाषिक ईसमच अध्यक्ष होते. त्यामुळे पुन्हा हिंदी भाषिकास संधी देण्याऐवजी सद्यस्थितीत ओबीसीला महत्त्व देण्याचे भाजपाचे धोरण पाहू जाता, या ठिकाणी बारी समाजाचा नाही तर अन्य ओबीसी समाजाचा तरी अध्यक्ष करावयास हवा होता.
वास्तविक विलास बोडखे हे बारी समाजाचे अर्थात ओबीसी आहेत. मूळचा हा समाज भाजप-धार्जिणा आहे. मतदारसंघात या समाजाचे मतदानही दखलपात्र आहे. त्यामुळेच निवडणूक काळात या समाजातील बड्या लोकांच्या घरी जाऊन भारसाखळे चांगलीच मखलाशी करतात. त्यामुळे नगाला नग म्हणून आणि आपली वोट बँक कायम राहावी म्हणून तरी या समाजाचा अध्यक्ष करावयास हवा होता. परंतु तसे न झाल्याने हा समाज कमालीचा दुखावला आहे.
अवघ्या तीन महिन्यातच त्यांच्या माणसाला अध्यक्षपदावरून पायउतार व्हावयास लावल्याने, या समाजाचे कार्यकर्त्यांमध्ये आपला अपमान झाल्याची भावना बळावली आहे. त्यातच यापूर्वीचे अध्यक्ष कनक कोटक यांना आकोट शहर अध्यक्ष पद निघताच जिल्हा चिटणीस म्हणून घेण्यात आले आहे.
तसाच प्रयोग विलास बोडखेंबाबतही करता आला असता. दुसरीकडे नवनियुक्त अध्यक्ष हरीश टावरी हे या पदी येण्यापूर्वी जिल्हास्तरीय पदाधिकारी होते. तरी त्यांना तेथून कमी करून आकोट शहराची कमान सोपविण्यात आली. परंतु बोडखे यांना मात्र उपेक्षितच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारसाखळे यांना संपूर्ण ओबीसींची एलर्जी झाल्याची भावना जोर धरू लागली आहे. म्हणूनच योग्य वेळ येताच भारसाखळे यांचा वचपा काढल्या जाणार असल्याचे ऐकावयास मिळत आहे.