Thursday, November 14, 2024
Homeराजकीयग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन...

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन…

न्युज डेस्क – ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व यांच्या समवेत सर्व ह. भ. प. महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण दशरथ मेंगडे, परमेश्वर गणपत बोधले, लक्ष्मण् बाबुराव तकीक, 

विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, राधाबाई ज्ञानोबा सानप यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संत महंत, कीर्तनकार आदिंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा विधीमंडळात सत्कार केला व आभार व्यक्त केले.

ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकास होण्याकरिता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजुरी देण्यात आली.

या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना सुमारे 2000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. तसेच पर्यटन विभागामार्फत देखील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे 1000 कोटी रुपयांचा निधी  तीर्थक्षेत्रांच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या ‘भव्य काशी दिव्य काशी’, बद्री केदार देवस्थान विकास, उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर, अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली. आता ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटी ऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध होत आहे.

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरुंना विविध सोयीसुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरविणे शक्य होत नाही.

म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने घेतला. १६ नोव्हेंबर २०१२ नंतर २ कोटी या मर्यादेत निधी मंजूर केलेल्या तिर्थक्षेत्रांना नविन प्रस्तावित निकषाप्रमाणे ३ कोटी इतका निधी मंजूर करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह, शौचालय, वाहनतळ, भक्त निवास, रस्त्यावरील दिवे आणि संरक्षण भिंत, वृक्ष लागवड करणे इत्यादी सुविधा या निधीतून उपलब्ध करुन दिल्या जातील.

४८० तीर्थक्षेत्रांना होणार लाभ

राज्यात ‘ब’ वर्ग दर्जा असलेली एकूण ४८० तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्रांना वाढीव निधीचा लाभ होणार आहे. तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या 4 लाख असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक असते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: