द्वारसभेत सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निर्धार…
मंत्रालयात कर्मचारी संघटनेसोबत झालेली चर्चा निष्फळ. कर्मचारी संतप्त…
शरद नागदेवे, नागपूर
नागपूर :- राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर सेवा विषयक मागण्यासाठी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला असून या संपात जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.
सोमवार १३ मार्च रोजी सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयात फेर फटका मारून आज पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाबाबत जागृती करून जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील प्रांगणात एक द्वार सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. द्वार सभेनंतर आपल्या मागण्यांचे निवेदन बेमुदत संपाची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विपुल जाधव यांचेकडे लेखी स्वरूपात देण्यात आली.
दरम्यान मंत्रालयात १३ मार्च रोजी मुख्य सचिव त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे सोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले. व बेमुदत संप करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आज १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता पासून जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील प्रांगणात जमा होऊन आपल्या मागण्यासाठी आंदोलन पुकरणार आहेत. राज्य शासनाकडे ज्या मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, बक्षी समितीचा खंड २ शिफारस अहवाल फेटाळून नव्याने समिती गठित करणे, सर्व रिक्त पदे भरणे, मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण करणे, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० करणे, केंद्रा प्रमाणे भत्ते लागू करणे, विना अट अनुकंपाची पदे भरणे
आदी २० पेक्षा अधिक मागण्यांचा समावेश आहे. परंतु जुनी पेन्शन योजना लागू करणे या एकमेव मागणीसाठी सर्व कर्मचारी आग्रही होते.आजच्या द्वारसभेत ज्यांनी नेतृत्व केले त्यामध्ये संजय सिंग, डॉ. सोहन चवरे, अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, गोपीचंद कातुरे, विजय कोकड्डे, विष्णू पोटभरे, संतोष जगताप, किशोर भिवगडे, सुभाष पडोळे, निरंजन पाटील, नरेंद्र मेश्राम, योगेश हरडे आदी कर्मचारी नेते सहभागी होते.