गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त
पातूर – निशांत गवई
आलेगाव येथील एका महिलेने तीन दिवसांपूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आल्यानुसार या महिलेच्या मुलाचे गावातील काही लोकांनी धर्मांतर घडवून आणण्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार 15 जुलै रोजी आलेगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासून आलेगाव कडकडीत बंद आहे.
आलेगावातील एका 19 वर्षीय युवकाचे चार लोकांनी जबरदस्ती धर्मांतरण घडवून आणल्याची तक्रार मुलाच्या आईने चान्नी पोलिसांमध्ये तीन दिवसांपूर्वी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून चारही आरोपींना अटक केली. धर्मांतरण झाल्याचा आरोप असलेल्या युवकाची सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी केली.
या प्रकरणाचे पडसाद जिल्हा सह संपूर्ण राज्यात उमटायला लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुद्धा स्वतः आलेगावात येऊन या प्रकरणाची पडताळणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. प्रारंभी या प्रकरणात वेळ काढू पणाची भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी आता मात्र प्रकरण गांभीर्याने घेऊन कसून चौकशी सुरू केलेली आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी शांततेत बंद पाळण्यात आला. या स्वयंस्फूर्त बंदला आलेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शनिवारी सकाळपासून आलेगावातील दुकाने, बाजारपेठ बंद आहेत. खाजगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
काही शाळा सुरू आहेत मात्र या शाळेत पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवले नाही. हा बंद सकाळपासून अगदी शांततेत सुरू आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
आरसीपी च्या दोन तुकड्या आलेगावात तैनात करण्यात आल्या असून पातुर, बाळापूर येथील पोलीस ठाण्यांचे कर्मचारी देखील आलेगावात दाखल झालेले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख लक्ष ठेवण्यात येत आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरीत… रमण जैन
दरम्यान आलेगावातील या धर्मांतर प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केलेले असून या प्रश्नांची उत्तरे मिळणे अद्याप बाकी आहे. या प्रकरणात समोर आलेला उंद्री येथील मौलाना कोण आहे? तो कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? त्याने आतापर्यंत किती धर्मांतर घडवून आणले? त्याचे कुणाकुणाशी संपर्क आहेत?
या घटना आलेगावातच वारंवार का घडतात? धर्मांतर प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्यांना कुणाकडून काय मोबदला मिळतो? किंवा धर्मांतर केलेल्यांना कुणाकडून काय मिळते? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात अजूनही अनुत्तरीत असून त्याचा सखोल तपास करावा
रमण जैन तालुका अध्यक्ष भाजपा
धर्मांतराच्या निषेधार्थ रॅली
आलेगाव येथील सकाळी नऊ वाजता च्या सुमारास श्रीराम मंदिर पासून धर्मांतराच्या निषेधार्थ सकल हिंदू बांधवांनी रॅली काढत निषेध नोंदवला यावेळी आदर्श गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन भाजपा तालुका अध्यक्ष रमण जैन शिव सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र मूर्तडकर वंचित चे विश्वास खुळे गणेश ढोणे ज्योती दाभाडे यांनी भाषण दिले यावेळी शेकडो हिंदू बांधव उपस्थित होते
गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत भाजपा चे सरकार आहे तरीसुद्धा महाराष्ट्र मध्ये धर्मांतर होत आहे आलेगाव मध्ये जे धर्मांतर झाले ते कसे झाले याचा शोध सरकार ने घ्यावा
रवींद्र मूर्तडकर तालुका अध्यक्ष शिव सेना (उबाठा)