आकोट- संजय आठवले
संपूर्ण देशात केंद्र सरकार द्वारे निर्धारित नियम व धोरणांचा अवलंब करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उर्दू शिक्षकांना दिल्या जाणारा पुरस्कार आकोट येथील उर्दू शिक्षक नासिर शाह यांना दिल्ली येथे प्रदान करण्यात आल्याचे निमित्ताने या क्षेत्रात आकोटचा दबदबा दिल्ली येथे कायम झाला असून आकोटच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
केंद्र सरकार द्वारे जारी करण्यात आलेले नियम व धोरणे काटेकोरपणे राबवून उर्दू भाषेला बढावा देण्याचे कार्य करणाऱ्या उत्कृष्ट उर्दू शिक्षकांना केंद्र शासनाद्वारे दरवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. त्याकरिता निवड समिती देशभरातून उत्कृष्ट उर्दू शिक्षकांची निवड करते. यावेळी या पुरस्काराकरिता आकोट येथील मोहम्मद इमरान पटेल शाळेचे उर्दू शिक्षक नासिर शाह वजीर शाह यांची निवड करण्यात आली.
त्यांना हा पुरस्कार गालिब अकॅडमी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या तिसऱ्या राष्ट्रीय संमेलनात प्रदान करण्यात आला. याकरिता संपूर्ण देशभरातील 20 पेक्षाही अधिक राज्यांमधून शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख अतिथी श्रीमती सालेहा रशीद अलाहाबाद विद्यापीठ, मोहम्मद इमरान पटेल उर्दू स्कूल विश्वविद्यालय, मौलाना डॉ. अब्दुलमलिक, मिल्ली काउंसिल अध्यक्ष दिल्ली, प्रोफेसर स्वालेह चौधरी जम्मू कश्मीर विश्वविद्यालय, मुफ्ती मोहम्मद साजिद हुसैन दिल्ली, कौमी उर्दू शिक्षक संघ राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वासिल गुर्जर, राष्ट्रीय उपाध्यक्ष सैय्यद महताब इब्राहिम, प्रदेश अध्यक्ष आबेद खान, महाराष्ट्र महासचिव जैनउल आबेदीन, श्रीमती कनीज़ फातिमा, यांनी हा पुरस्कार नासिर शाह वजीर शाह यांना प्रदान केला.