Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनआकोटचा अनुप परिश्रमाने मुंबईत बनला चित्रपट कार्यकारी निर्माता…शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा…

आकोटचा अनुप परिश्रमाने मुंबईत बनला चित्रपट कार्यकारी निर्माता…शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील एका मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेल्या अनुप गोरे ह्या युवकाने मुंबई येथे कठीण परिश्रम करून सध्या गाजत असलेल्या “जग्गू आणि ज्यूलिएट” या मराठी चित्रपटाचा कार्यकारी निर्माता होण्यापर्यंतची मजल मारली आहे. शिक्षकी पेशातील वडील व व्यावसायिक काका यांचे संस्कार व मार्गदर्शनात आकोट शहरात आपले शालेय शिक्षण घेऊन अनुपने चित्रपट व्यवसायात आपले भक्कम स्थान निर्माण केल्याने आकोट शहराचे लौकिकात मोलाची भर घातली आहे.

आकोट शहरातील दूरदर्शन चौकातील मनोहरराव गोरे यांच्या मध्यमवर्गीय परिवारात अनुपचा जन्म झाला. वडील अशोकराव गोरे हे श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक तर काका दीपक गोरे हे एक होतकरू व्यावसायिक. दोघेही विज्ञान शाखेचे पदवीधर. मात्र कला हा पूर्ण कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. तेच संस्कार अनुपवर झाले. वडील आणि काका या दोघांकडून बाळकडू प्यायलेला अनुपही कलेचा उपासक बनला.

आकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयातून त्याने शैक्षणिक पदवी प्राप्त केली. त्यानंतर नव्या क्षितिजाच्या शोधात त्याने पुसद येथे इंजिनियर शाखेत प्रवेश घेतला. तेथे दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्याला रिलायन्स कंपनीत ॲनिमेट म्हणून काम करण्याचा मोका मिळाला. तिथे त्याचा हूनर पाहून कंपनीने त्याला पुणे शाखेत पाठविले. या ठिकाणी काम करताना अनुपचा चित्रपट सृष्टीशी संबंध आला.

जात्याच मृदूभाषी, मितभाषी असलेल्या अनुपने हां हां म्हणता अनेक दिग्गजांशी जवळीक निर्माण केली. ख्यातनाम संगीतकार, चित्रपट निर्माते, गायक, अभिनेते, अभिनेत्री यांचा तो लाडका बनला. धर्मवीर चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने थेट एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचेशी त्याचे सख्य झाले. प्रांजळपणा, परिश्रम आणि जिद्द या जोरावर त्याने अनेक हिंदी मराठी चित्रपटात पडद्यामागील महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या.

अशा स्थितीत अनुप सुप्रसिद्ध उद्योजक पुनित बालन यांचे संपर्कात आला. पहिल्या भेटीतच अनुपने त्यांच्यावर आपली छाप पाडली. ईतकी की, त्यांनी या पहिल्या भेटीतच “जग्गू आणि ज्यूलिएट” या आपल्या मराठी चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणून अनुपला करारबद्ध केले. हॉलिवूडचे नामवंत सिनेमॅटोग्राफर महेश लिमये हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अजय अतुल या सुप्रसिद्ध संगीतकारांनी हा चित्रपट संगीतबद्ध केला आहे. अमेय वाघ, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, समीर चौगुले या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी रिलीज झाला असून पुणे मुंबई येथे तुफान गर्दी खेचत आहे.

अनुपने आजपर्यंत तब्बल ५३ मराठी चित्रपटात कार्यकारी निर्माता, डिजिटल समन्वयक म्हणून कामगिरी बजावलेली आहे‌ मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, मीडियम स्पायसी, एकदा काय झाले अशा अनेक चित्रपटांच्या पडद्याआडच्या मोलाच्या जबाबदाऱ्या अनुपने पार पाडलेल्या आहेत. परंतु इतके सारे असूनही अनुपला ‘ग’ ची जराही बाधा झालेली नाही. आकोटातून मुंबईत गेलेल्या कुणीही त्याचेशी संपर्क केल्यास हा हसतमुख छोकरा त्यांच्या मदतीस नेहमी तयार असतो.

आणि हे संस्कार आपल्याला आपले वडील अशोक गोरे आणि काका दीपक गोरे यांचेकडून मिळाल्याचे तो आवर्जून सांगतो. त्याच्या या विनयाने आणि परिश्रमाने त्याने स्वतः मानाचे स्थान प्राप्त करून शहराचाही लौकिक वाढविला आहे.महत्त्वाचे म्हणजे अनूपचे काका दीपक गोरे यांनीही सहनिर्माता म्हणून अघोर आणि ते दोन दिवस हे चित्रपट तर निर्माता म्हणून शेगावीचा योगी गजानन हा चित्रपट तयार केला आहे. त्यांनी शिवसेनेवर तब्बल चार डॉक्युमेंटरी बनविल्या आहेत.

तीन शॉर्ट फिल्म्सही बनविलेल्या आहेत. त्यांनी आजवर राजू श्रीवास्तव, अहसान कुरेशी, जॉनी लिव्हर, वैशाली माडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसह टेन स्टार्स शोध चे तसेच अनेक आर्केस्ट्रांचे यशस्वी आयोजन आणि मंच संचालन केले आहे. असा हा कलागुणसंपन्न गोरे परिवार आपल्या यशाचे सर्व श्रेय आकोट आणि आकोटकरांना देतो याचा आकोटकरांनाही अभिमान आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: