आकोट – संजय आठवले
गणपती विसर्जना दरम्यान आकोट शहरात झालेल्या दगडफेकीमुळे या वेळची दुर्गा विसर्जनाची मिरवणूक ही अघटिताच्या सावटाखाली आलेली असतानाच पोलीस प्रशासनाची सतर्कता व आकोटकरांची समजदारी फळाला आली असून त्यायोगे आकोटकरांचा विजय झाला तर कायदा व सुव्यवस्थेची सरशी झाली आहे. परिणामी आपसी भाईचाऱ्यास मोठे बळ प्राप्त झाले असून समाजकंटकांना मात्र तोंडघशी आपटावे लागले आहे.
गत गणेश विसर्जन मिरवणुकी मधील गणेश मंडळावर दगडफेक झाल्याने काही काळापुरते शहरातील वातावरण तापले होते. तशा स्थितीत हिंदू मुस्लिम या उभय पक्षांनीही अतिशय समजूतदारपणाची भूमिका घेतल्याने शहरात काही घडलेच नाही असे म्हणण्यापर्यंत वातावरण निवडले निवळले. आकोट बंदच्या दुसऱ्या दिवसापासूनच शहरातील दैनंदिन व्यवहार पूर्वीच्या जोमाने सुरू झाले. आणि चार दोन दिवसात लोक ती घटना विसरूनही गेले. परंतु असे होणे नको असणाऱ्या काही लोकांच्या पोटात मात्र अधून मधून पित्ताची उबळ उठतच होती. पण त्याकडे कुणीच गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यांच्या उलट्या उलट्याच राहिल्या.
हे असे असले तरी प्रशासनाने मात्र दुर्गा विसर्जनावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. ही मिरवणूक सुरळीत पार पाडण्याकरिता उच्च स्तरावर उपाययोजना आखल्या गेल्या. त्यांची अंमलबजावणी ही काळजीपूर्वक केली गेली. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक जातीने लक्ष ठेवून होते. शहरातील शांतता समिती सदस्यही सतर्कता बाळगून होते.
अखेर दुर्गा विसर्जनाचा दिवस उजाडला. आणि आकोट शहर पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, ठाणेदार अमोल माळवे यांचे सह १६ पोलीस निरीक्षक, ५४ एपीआय व पीएसआय, ९०० पोलीस अंमलदार, आरपीएफ च्या २ तुकड्या, एस आर पी एफ ची १ तुकडी, 200 होमगार्ड, ड्रोन कॅमेरे, ३०० हँडल कॅमेरे असा ताफा तैनात करण्यात आला.
शहरातील संवेदनशील भाग बंदिस्त करण्यात आला. त्यानंतर मोठ्या वाजत गाजत दुर्गा मिरवणूक सुरू झाली. आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, ठाणेदार अमोल माळवे तथा महसूल अधिकारी मिरवणुकीत सामील होऊन जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवताना आढळून आले. शांतता समिती सदस्य ही मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सामील होते. मिरवणूक मार्गावर महिलांची प्रचंड उपस्थिती जाणवली. दुर्गा मंडळांनी ही आपली जबाबदारी ओळखून शिस्तीचे पालन करण्याचा प्रशंसनीय प्रयास केला. अखेर कोणतेही गालबोट न लागता ह्या वेळची दुर्गा विसर्जन मिरवणूक निर्धारित वेळेत संपन्न झाली.
आणि मागील गणेश विसर्जना वेळची आकोटकरांची समजदारी सफल झाली. त्यामुळे या मिरवणुकीने आकोट शहरातील तमाम नागरिक यांच्या विजयावर व कायदा सुव्यवस्थेच्या सरशीवर शिक्कामोर्तब केले. त्यासोबतच अगदी उंबरठ्यावर असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही खोडसाळपणा करण्याची समाजकंटकांची खरुज जागेवरच दाबली गेली असे म्हणावयास काही हरकत नाही.