आकोट- संजय आठवले
आकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन ईमारत लोकार्पण सोहळ्याचे निमित्त्याने विद्यमान जि. प. सदस्य तथा विद्यमान ग्रा.पं. सरपंच एकमेकांना आव्हान प्रती आव्हान देत अमोरासमोर उभे ठाकल्याने मोठा पेच निर्माण झाला असून या लोकार्पण सोहळ्याकरिता येणाऱ्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे उपस्थितीतच या लोकार्पण मंडपात उपोषणास प्रारंभ करण्याचा पवित्रा सरपंचांनी घेतला आहे. त्यामुळे या लोकार्पण सोहळ्यावर उपोषणाचे सावट पसरले आहे.
त्याचे झाले असे कि, आसेगाव बाजार येथे जिल्हा परिषद द्वारे शाळेकरीता नवीन ईमारत बांधण्यात आली. शाळेचे निर्माण सुरू असतानाच आसेगाव बाजारचे सरपंच निलेश नारे आणि त्यांचे सहकारी उपसरपंच राहुल धांडे, ग्रामपंचायत सदस्य सुगत धांडे, ग्रामपंचायत सदस्यपती उमेश धांडे आणि ग्रामस्थ नितीन धांडे व रोहित धांडे यांनी बांधकामा संदर्भात आक्षेप घेतला होता. त्याकरिता त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जि. प. अकोला यांच्याकडे लिखित तक्रारी केल्या होत्या. बांधकामात निकृष्ट साहित्य वापरण्यात येत असल्याची त्यांची तक्रार होती. या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी असलेले अभियंता भास्कर यांनीही या साहित्याची पडताळणी केली नसल्याचीही सरपंचांची तक्रार होती. मात्र त्या संदर्भात संबंधित यंत्रणांनी कोणतीच दखल घेतली नाही. ही दाखल न घेणे बाबत जि. प. सदस्य गजानन पुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा सरपंच निलेश नारे यांचा आरोप आहे. त्यामुळे सरपंचाच्या तक्रारीची चौकशी न होताच शाळेच्या नवीन ईमारतीचे काम पूर्ण करण्यात आले.
त्यानंतर जि. प. सदस्य गजानन पुंडकर यांनी पुढाकार घेऊन दिनांक ९.५.२०२३ रोजी या नूतन शाळा ईमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. हे लोकार्पण अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे हस्ते होणार असून जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार हे प्रमुख अतिथी राहणार आहेत. या सोहळ्याचे तडकाफडकी आयोजन करण्यात आले. एकाच दिवसात निमंत्रण पत्रिका छापून त्यांचे वितरणही करण्यात आले. त्यावर सरपंच निलेश नारे यांनी जोरदार उठाव केला आहे. शाळेचे बांधकाम अतिशय निकृष्ट झाल्याने शाळेत येणाऱ्या ९९ बालकांचे जीवितास या इमारतीपासून धोका असल्याचे त्यांचे मत आहे. त्याकरिता आधी ईमारतीचे बांधकामाची पडताळणी करावी. ती सुरक्षित असल्याची खातरजमा करावी आणि नंतरच ईमारतीचे लोकार्पण करावे. असा पवित्रा सरपंच आणि त्यांचे समर्थक यांनी घेतला आहे. परंतु तसे न होता लोकार्पण अगदी उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे या लोकार्पण सोहळ्याच्या मंडपातच आपल्या समर्थकांसह उपोषणास बसण्याचा निर्धार सरपंच नारे यांनी केला आहे. तशा आशयाची निवेदनेही त्यांनी जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी तथा गटविकास अधिकारी आकोट यांना पाठविली आहेत.
त्यांच्या या पावित्र्याने शाळेच्या नूतन ईमारत सोहळ्यावर उपोषणाचे सावट पसरले आहे. संपूर्ण गावभर हाच एक विषय चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे खुद्द जिल्हाधिकारी यांचे समक्ष हा प्रकार होणार आहे. त्यामुळे ९ मे रोजी होणाऱ्या या रंगतदार सामन्याकडे असंख्य नजरा लागल्या आहेत.