Saturday, November 16, 2024
Homeराज्यआज प्रशासक व्यापारी वादावर तोडगा निघणार काय? अगतिक कास्तकारांचा भाबडा प्रश्न…त्यांची अस्वस्थता...

आज प्रशासक व्यापारी वादावर तोडगा निघणार काय? अगतिक कास्तकारांचा भाबडा प्रश्न…त्यांची अस्वस्थता प्रशासक व्यापारी समजून घेतील काय?…

आकोट- संजय आठवले

आकोट बाजार समिती मधील प्रशासक व व्यापारी यांचे मध्ये निरर्थक चार शब्दांमुळे निर्माण झालेल्या व नंतर मुख्य प्रशासकांमुळे अगदी टोकाला गेलेल्या वादावर आजच्या संयुक्त बैठकीत तोडगा निघणार काय? याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण झालेले आहे. ज्या चार शब्दांमुळे व्यापारी प्रशासकात वादाची ठिणगी पडली त्या शब्दांबाबत शेतकऱ्यांचा मात्र काहीही आक्षेप नसल्याचे त्यांचे बोलण्यातून जाणवले असून निरर्थक बाबी करिता आमचे मरण होत असल्याच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

कापसाच्या सौदा पट्टीवर “ओला हलका माल वापस” हे चार शब्द लिहिण्यावरून आकोट बाजार समितीमध्ये व्यापारी व मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांचे मध्ये खटका उडाला आहे. पुंडकरांच्या मते हे शब्द बेकायदेशीर आहेत. ते लिहिल्याने कास्तकारांचे नुकसान होणार आहे. म्हणून ते शब्द सौदापट्टीवर लिहिले जाणार नाहीत. परंतु हे शब्द लिहिल्याने कास्तकारांचे काय नुकसान झाले? या विरोधात किती कास्तकारांच्या तक्रारी आहेत? या प्रश्नांची पुंडकरांकडे कोणतीही उत्तरे नाहीत. दुसरीकडे व्यापारी म्हणतात हे शब्द सौदापट्टीवर लिहिण्याची परंपरा अतिशय जुनी आहे. पुंडकर सभापती असतानाही हे शब्द लिहिले जात होते. परंतु या शब्दांमुळे आम्ही एकाही कास्तकाराचा कापूस परतविलेला नाही. कास्तकार इईमानी आहेत. ते गैरप्रकार करीत नाहीत. परंतु किरकोळ व्यापारी मात्र कापसात घपला करतात. त्यांच्यावर वचक ठेवण्याकरता हे शब्द लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर “हे शब्द नकोत आणि शब्द हवेतच” असा वाद विकोपाला गेला.

पुंडकरांनी तिरिमिरीत २० कापूस व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले. इतके करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी व्यापाऱ्यांच्या बँकांना पत्र देऊन त्यांचे व्यवहार थांबण्यास सांगितले. ह्या व्यक्तिगत वाराने व्यापाऱ्यांचे पित्त खवळले. परिणामी ६ डिसेंबर पासून आकोट बाजारात शुकशुकाट आहे. त्याने कास्तकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वास्तवात बाजार समितीची स्थापनाच कास्तकारांच्या हिताकरिता आहे. परंतु आज त्यांचेच अमित होत आहे. म्हणजे बाजार समितीच्या मूळ उद्देशालाच सुरुंग लागला आहे.

विशेष म्हणजे पुंडकर ज्या कास्तकारांच्या हिताची काळजी करीत आहेत त्या कास्तकारांचा मात्र व्यापाऱ्यांवर जराही रोष नाही. “ओला हलका माल वापस” हे चार शब्द सौदापट्टीवर लिहिले असले तरी कापसाबाबत वाद निर्माण झाल्यास वांधा समितीच्या माध्यमातून हजारदा हे वाद मिटल्याचेही कास्तकार सांगतात. यावरून मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी या चार शब्दांचा उगीच धसका घेतल्याचे लक्षात येते. आणि हा धसका इतका जबरदस्त आहे की त्या शब्दांसाठी त्यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ती का म्हणून? या प्रश्नाचे उत्तर मात्र ते देत नाहीत. बाजार सचिव दाळू सांगतात की, सौदापट्टीवर हे चार शब्द लिहिणे गैर कायदेशीर आहे. मी आणि पुंडकर कोणतेही गैरकायदेशीर काम करीत नाही. होऊ देणार नाही. परंतु या चार शब्दांनी कुणाचे नुकसान झाल्याचे अथवा कुणाची तक्रार असल्याचे त्यांनाही आठवत नाही. मग ह्या चार शब्दांत करिता तालुक्यातील कास्तकारांना कशाकरिता वेठीस धरल्या जात आहे हे कळायला मार्ग नाही. आश्चर्य म्हणजे या निरर्थक चार शब्दांना गैर कायदेशीर ठरविणारे पुंडकर आणि दाळू स्वतः मात्र कायदा, नियम बंधनाच्या चिरफाड्या करीत असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही.

वास्तविक बाजारात आलेल्या वाहनातील कापसाचा दर्जा ठरवणे हे नियमानुसार बाजार समितीचे काम आहे. बाजार समितीने या कापसाची चाचणी घ्यायची असते. त्यानंतर त्या कापसाच्या गुणवत्तेवरून त्याचा दर्जा ठरवायचा असतो. नंतर त्याचे प्रमाणपत्र तयार करून हे प्रमाणपत्र त्या वाहनावर लावावे लागते. त्यानंतर त्या प्रमाणपत्राचे आधारे त्या कापसाचा लिलाव करायचा असतो. परंतु पुंडकर आणि दाळू यांनी ही कायदेशीर प्रक्रिया कधीच पार पाडलेली नाही.

बाजार समितीमधील व्यवहार चालू बंद ठेवण्याकरिता आगामी वर्षाचे कॅलेंडर तयार करून त्याला जिल्हा उपनिबंधकांची मान्यता घ्यावी लागते. अर्थात बाजार ज्या तारखांना बंद ठेवण्यात येईल त्या तारखा ठरवायच्या असतात. ह्या तारखा वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करून बाजार समितीच्या नोटीस बोर्डवर आणि डिस्ले बोर्डवर समितीच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रसिद्ध कराव्या लागतात. त्यानंतर या तारखांना वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल, रेडिओ आणि पत्रकांचे माध्यमातून प्रसिद्धी द्यावी लागते. त्यानंतर या साऱ्या नियोजनाची माहिती सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका, तहसील, पंचायत समिती यांचे कार्यालयांना कळवावी लागते. यातील एकाही नियमाचे पालन पुंडकर दाळू ह्या जोडीने केलेले नाही.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही स्थितीत बाजार समिती सलग पणे तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बंद ठेवता येत नाही. असे करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार समितीला आहेत. परंतु ही कारवाई करताना बाजार चालू राहण्याची पर्यायी व्यवस्था समितीने करणे आवश्यक आहे. मात्र पुंडकर दाळू या जोडीने या नियमातील आपल्या सोयीचा भाग म्हणून व्यापाऱ्यांशी चर्चा न करता आडमूठेपणाने २० व्यापाऱ्यांवर परवाने निलंबनाची कारवाई केली. परिणामी ६ डिसेंबर पासून बाजार बंद आहे. परंतु बाजार चालू करण्याकरिता पुंडकर दाळू या जोडीने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. ते चार शब्द निरर्थक असूनही त्यांना गैर्य कायदेशीर ठरविणाऱ्या पुंडकर दाळू या जोडीने स्वतः मात्र नियम, कायद्याची चौकटच उखडून टाकली आहे.

आणखी महत्त्वाचे म्हणजे ह्याच बाजार समितीमध्ये सीसीआय द्वारे सन २०२१ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या कापसाच्या सौदापट्टीवर “हलका वापस” हे दोन शब्द लिहिलेले आहेत. त्यावेळी मात्र कास्तकारांचे हितैषी गजानन पुंडकर यांनी कोणताच आक्षेप घेतलेला नाही. परंतु तेच परंपरागत शब्द स्थानिक व्यापाऱ्यांनी लिहिले असता त्यांचे पित्त खवळले. ते कशासाठी? हे कळायला मात्र मार्ग नाही.

आज दुपारी ३ वाजता व्यापारी प्रशासकांची संयुक्त बैठक होणार आहे. त्या बैठकीत या साऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्या चर्चेतून नेमके काय बाहेर निघते याकडे तालुक्यातील अकारण प्रताडित होत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: