Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीआकोट | मुख्याधिकाऱ्यांनी दिली उडविण्याची धमकी…माजी नगरसेवक पत्नीची पोलिसात तक्रार…प्रकरण काय आहे?...

आकोट | मुख्याधिकाऱ्यांनी दिली उडविण्याची धमकी…माजी नगरसेवक पत्नीची पोलिसात तक्रार…प्रकरण काय आहे? ते जाणून घ्या…

ठाणेदारांच्या मध्यस्थीने उभयपक्षी समेट…

आकोट- संजय आठवले

आकोट पालिकेच्या पोर्चमध्ये दुचाकी वाहन उभे केल्यावरून पालिका मुख्याधिकारी यांनी एका माजी नगरसेवकाला त्याचे वाहन उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर सदर माजी नगरसेवक “आऊट ऑफ कव्हरेज” झाला असता त्याच्या घाबरलेल्या पत्नीकडून मुख्याधिकारी यांचे विरोधात पोलीस तक्रार दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. परंतु दोन दिवसानंतर आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांचे मध्यस्थीने उभय पक्षी समेट होऊन या प्रकरणावर पडदा पडला आहे.

या रंजक घटनेची हकीकत अशी आहे कि, आकोट पालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी आपल्या दबंगगिरीने चांगलेच चर्चेत आले. आल्या आल्याच त्यांनी “नवा गडी नवे राज” म्हणून नवे फतवे जारी केले. पालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पोर्चमध्ये त्यांचे वाहनाखेरीज अन्य कुठलीही वाहने उभी करू नयेत, हा त्यातीलच एक फतवा. त्यावर काटेकोर अमल होणेकरिता त्यांनी पालिकेच्या एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तैनात केले. हा पोर्च बनल्यापासून इथे वाहने उभी करण्याची सवय झालेल्यांना हटकण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर सोपवली. त्यामुळे पोर्चमध्ये केवळ “साहेबांचीच गाडी” रुबाबात उभी राहत आहे. वास्तविक पोर्चमध्ये कोणतीही वाहने उभी ठेवीत नाहीत. पालिकेत आलेली मंडळी वाहनातून पोर्चमध्ये उतरल्यावर ते वाहन पार्किंगचे जागी उभे करण्याचा आणि साहेब जाताना ते वाहन पोर्चमध्ये आणून त्यात साहेबांना घेऊन जाण्याचा शिरस्ता आहे. परंतु आकोट पालिकेत सारीच वाहने पोर्चमध्ये आणि त्या भोवती उभी केली जातात.

अशा स्थितीत गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी अजहर शेख नामक माजी नगरसेवकाने आपली दुचाकी पोर्चमध्ये उभी केली. आणि ते कामानिमित्त पालिका कार्यालयात गेले. तितक्यात मुख्याधिकारी डॉक्टर बेंबरे यांचे चार चाकी वाहन तेथे भरधाव वेगाने आले. समोर दुचाकी पाहून त्यांचे पित्त खवळले. ते पाहून तेथे तैनात कर्मचाऱ्याने हाकाटी केली. ती ऐकताच अजहर शेख यांनी आपली दुचाकी तेथून हटविली. प्रसंग अगदी साधा होता. तो कोणताही दखल अथवा अदखल पात्र अपराध नव्हता. तरी डॉक्टर बेंबरे यांनी अजहर शेखकडे पाहून म्हटले कि, “अच्छा हुआ आज मेरा मूड अच्छा है, वरना है तुम्हारी गाडी उडा देता.” एका राजपत्रीत अधिकाऱ्याकडून अशा असांसदीय बोलांची अपेक्षा नसल्याने तेथे साहजिकच जराशी शाब्दिक चकमक झाली. तेथे उभे असलेले पालिकेचे माजी उपाध्यक्ष दिवाकर गवई यांनी ‘साहेबांचे’ वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यावरही आपला अच्छा मूड मधील राग प्रदर्शित करून ‘साहेब’ कार्यालयात गेले.

परंतु इकडे अजहर शेखची घालमेल वाढली. आपण दुचाकी वर नेहमीच बसलेले असतो. अशा स्थितीत आपली दुचाकी उडविली तर पंचाईतच होईल अशी त्यांना धास्ती वाटली. त्यातच डॉक्टर बेंबरे हे नक्षलग्रस्त भागातून आलेले आहेत. त्यामुळे ते आपल्यालाही नक्षलवादी समजले तर काय करायचे? हा प्रश्नही अजहर शेख यांना पडला. म्हणून मग त्यांनी सरळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर आपला मोबाईल ‘स्विच ऑफ’ करून ते शहरातून निघून गेले. माणूस गावातही नाही आणि मोबाईलही बंद आहे. त्यामुळे अनिष्टेच्या आशंकेने अजहर शेखची पत्नी घाबरून गेली. तिनेही घडलेल्या घटनेचा संदर्भ घेऊन पोलिसात तक्रार केली. हे वृत्त कर्णोपकर्णी होऊन शहरभर पसरले. आणि शहरात एकच चर्चा सुरू झाली. त्यासोबतच अजहर शेखची शोधाशोधही सुरू झाली. अखेर १७ फेब्रुवारीचे पहाटे तीन वाजता ते पोपटखेडच्या जंगलात विमनस्कपणे बसलेले आढळून आले. त्यांच्या मित्रांनी त्यांना धीर देऊन घरी आणले.

यादरम्यान पोलीस आपल्या तपास कार्यास भिडले होते. त्यामुळे अकारणच बाका प्रसंग निर्माण झाला. अशातच शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. त्याकरिता हे कर्तव्य पार पाडणाऱ्यांचे मनोबल उत्तुंग असणे गरजेचे आहे. त्यामुळे काही लोकांनी या प्रकरणात यशस्वी मध्यस्थी केली. त्यात आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी मोलाची भूमिका बजावली. अखेर दिनांक १८ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी डॉक्टर बेंबरे आणि अजहर शेख यांचा समेट घडून आला आणि या धमकी नाट्याचा शेवट गोड झाला.

हा प्रसंग ‘पेल्यातील वादळ’ ठरला असला, तरी मात्र या प्रसंगाने काही बाबी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. शहरात चर्चा आहे कि, मुख्याधिकारी यांचे शहरात मोजक्या लोकांशी उठणे बसणे आहे. ते असणे स्वाभाविक आहे. तो कोणताही अपराध नाही. परंतु दुसरी चर्चा अशी आहे कि, ही मंडळी डॉक्टर बेंबरेंना खोडसाळ माहिती पुरवून उगाच दबंग राहण्याचा घातकी सल्ला देते. त्यानुसार साहेब वर्तन करतात. ह्यात किती तथ्य आहे ते चर्चा करणाऱ्यांनाच ठाऊक. परंतु मुख्याधिकारी डॉक्टर आहेत. रुग्णाची नाडी ओळखण्याची किमया त्यांना अवगत आहे. आता ते मुख्याधिकारी आहेत. त्यामुळे शहरातील लोकांनी कुठे झोपावे, कुठे स्वयंपाक करावा, कुठे पूजाविधी करावा, कुठे कचरा टाकावा हे ठरविणाऱ्या संस्थेचे ते पालक आहेत. त्यामुळे त्यांचे लोकाभिमुख असणे अभिप्रेत आहे. लोकाभिमुख राहतांना त्यांनी कायम “डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर” ठेवणे अनिवार्य आहे. कारण कोणत्या स्तरातील कोणता नागरिक कोणती समस्या घेऊन त्यांचे पुढे येईल याचा नेम नाही. यासोबतच पालिकेच्या कामांशी संबंधित महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांशी सौहार्द्रपूर्ण व्यवहार ठेवणेही त्यांना आवश्यक आहे. येथे उल्लेखनीय आहे कि, पालिकेच्या परिसरात एक वृद्ध महिला नेहमीच दिसते. ती नबूबाई बोलता बोलता म्हणाली, “आताचा सायेब एकदम जवान पोरगा आहे. लय शिकेलय आहे. लय मोठा सायेब व्हईन तो.” हे वक्तव्य अतिशय मोलाचे आहे. डॉक्टर बेंबरे हे “लंबी रेस का घोडा” आहेत, हे त्यावरून अधोरेखित होते. पण तसेच लोकाभिमुख वर्तन असेल तर त्याला “चार चांद” लागतील.

येथे आवर्जून उल्लेखनीय आहे कि, आकोटकर फार चांगले आहेत. भरभरून प्रेम करतात. कायद्याचे पालनात कसूर करीत नाहीत. चार दोन सडके आंबे सर्वत्रच असतात. आकोटही त्याला अपवाद नाही. परंतु आपणच आगळीक करायची आणि त्या चार दोन आंब्याचे नावावर तमाम आकोटकरांना बदनाम करण्याचा खोडसाळ प्रयास यापूर्वी अनेक विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याने आकोटला शासन दरबारी नाहक बदनाम करण्यात आले आहे. परंतु अनेक अधिकारी आकोटातून गेल्यावरही येथे येण्यास उत्सुक आहेत. म्हणजेच आकोटकर पाहुणचार करण्यात अव्वल आहेत हे सिद्ध होते. त्यामुळेच आकोटशी काहीही संबंध नसताना आकोटकरांनी आमदार प्रकाश भारसाखळेंना दोनदा आमदार केले आहे. आता ते तिसऱ्यांदाही आमदार होण्यास उत्सुक आहेत. त्यांची ही उत्सुकताच आकोटकर सहनशील आणि समजूतदार असल्याची पावती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही आकोटकरांची ही नाडी ओळखून वर्तन करण्यातच साऱ्यांचे “चांग भले” आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: