अकोट – संजय आठवले
गत अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या आकोट तालुका सहकारी सूतगिरणीची लिलावाद्वारे विक्री करण्यात आल्याने आपल्या थकीत वेतन, त्यावरील व्याज व भविष्य निर्वाह निधी मिळण्याकरता सूतगिरणी कामगारांनी आकोट तहसीलवर मोर्चा नेला.
याप्रकरणी आकोट तहसीलदार निलेश मडके यांना मोर्चेकर्यांनी निवेदन दिले. या निवेदनात नमूद आहे की, आकोट तालुका सहकारी सूतगिरणीचा लिलाव जानेवारी २०२२ मध्ये झाला. त्यात ही सूतगिरणी श्रीकृष्ण कॉटन ट्रेडर्स या फर्मने विकत घेतली. लिलावासंदर्भातील करारानुसार सूतगिरणी कामगारांचे तुंबलेले वेतन, त्यावरील व्याज व त्यांचा भविष्य निर्वाह निधी हा निलाव घेणाऱ्याने अदा करावयाचा आहे.
परंतु तसे न होता सदर फर्मने दिनांक १२.०९.२०२२ रोजी सूतगिरणी ताब्यात घेतली आहे. करारानुसार लिलाव घेणाऱ्याने कामगारांचे देणे घेणे पूर्ण केल्यावरच पुढील कार्यवाही करणे अनिवार्य होते. परंतु तसे न झाल्याने कामगारावर अन्याय झाला आहे. त्यामुळे सूतगिरणीवर सदर फर्मने केलेला अवैध कब्जा हटवून कामगारांचे देणे चुकते केल्यावरच त्यांना ताबा द्यावा. असे न झाल्यास सात दिवसानंतर कामगारांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा कामगार समन्वय समितीने दिला आहे.