आकोट- संजय आठवले
आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे ह्यांची पदोन्नतीने अपर जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूर येथे बदली झाली आहे. आपला पदभार तत्काळ सोडून बदलीचे ठिकाणी रुजू होण्याचे शासकीय आदेश असल्याने त्यांनी गत शुक्रवारी म्हणजे ४ नोव्हेंबर रोजीच आपला पदभार सोडला आहे.
येत्या बुधवारी अर्थात ९ नोव्हेंबर रोजी ते बदलीचे ठिकाणी डेरे दाखल होणार आहेत. सोज्वळ स्वभावाचा एक मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची आकोट उपविभागात ओळख झाली आहे. अनेक गरजूंना त्यांनी योग्य तो दिलासा दिल्याने त्यांचे बाबत आकोट उपविभागातील जनमत चांगले आहे.श्रीकांत देशपांडे यांच्या रिक्त जागी अकोला येथे कार्यरत असलेले भूसंपादन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांना प्रभार देण्यात आला आहे.
यासोबतच त्यांच्याकडे अकोला अपर जिल्हाधिकारी पदाचाही प्रभार आहे. आकोट येथे त्यांची ही प्रभारी नियुक्ती किती दिवसांची आहे याबाबत शाश्वती नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचे मत अनुकूल झाल्यास विश्वनाथ घुगे हे आकोटचे नवीन उपविभागीय अधिकारी म्हणून रुजूही होऊ शकतात.
आकोटचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे आकोट पालिका प्रशासकपदाचाही प्रभार आहे. त्यामुळे आता श्रीकांत देशपांडे बदलीवर गेल्याने पालिकेच्या प्रशासक पदाचा प्रभारही विश्वनाथ घुगे यांचेकडेच येणार आहे. यापूर्वी आकोटचे तहसीलदार म्हणून त्यांची कारकीर्द चांगली राहिलेली आहे एक कामसू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचे प्रभारी कारकिर्दीत आकोट पालिकेची अनेक कामे मार्गी लागतील अशी आशा आहे. ते सुद्धा येत्या बुधवारी अर्थात नऊ नोव्हेंबर रोजी आकोट येथे रुजू होत आहेत.