अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आकोट ने गत पाच ते सहा महिन्यांपासून घातलेल्या खोड्याने आकोटातील असंख्य श्रावणबाळ व संजय निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ह्या खोड्यातून अतिशिघ्र सोडविण्याचे अभिवचन आकोट उपविभागीय अधिकारी यांनी स्वातंत्र्यदिनी या पिडीतांना दिले आहे.
संपूर्ण भारत देश स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना ऐन स्वातंत्र्यदिनी २०० ते २५० लोकांनी आकोट तहसील येथे येऊन आपले गार्हाणे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे कानी घातले. ह्या लोकांचे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा आकोट मध्ये खाते काढलेले आहेत. या लोकांना दरमहा देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयाकडून बँकेकडे पाठविण्यात येते. त्यानुसार बँकेने त्या त्या लाभार्थ्यांना त्यांची निश्चित रक्कम द्यावी असे अपेक्षित आहे. परंतु गत पाच ते सहा महिन्यांपासून या बँकेने या लाभार्थ्यांचे अनुदान रोखलेले आहे.
त्यासाठी बँकेने कारण पुढे केले आहे की सदर शाखेमध्ये तहसीलदार अकोट यांचे नावे खाते नाही. आधी ते खाते उघडावे आणि नंतर त्यामध्ये या लोकांच्या अनुदानाची रक्कम जमा ठेवण्यात यावी. त्यानंतर त्या खात्यातून ह्या लाभार्थ्यांना ती रक्कम अदा करण्यात येईल. असे खाते उघडल्याखेरीज त्या रकमेचे वितरण करता येणार नाही. ह्या तांत्रिक अडचणीमुळे बँक या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान देत नाही. परंतु यामध्ये दुसरी तांत्रिक अडचण ही आहे की, तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावरून परस्पर असे खाते बँकेत उघडता येत नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
त्यामुळे वंचितांचे गार्हाणे ऐकून आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी त्वरित दूरध्वनीवरून अकोला वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यावर वरिष्ठांनी उपविभागीय अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्यास अनुमती दिली. त्यानुसार शासकीय सुट्ट्या आटोपताच कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी वंचितांचा हा प्रश्न सोडविण्यात येईल असे अभिवचन आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्वातंत्र्यदिनी या वंचितांना दिले. त्यांच्या ह्या तत्परतेचे वंचीतांकडून कौतुक केल्या गेले.