Saturday, December 21, 2024
HomeBreaking Newsआकोटात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक…दगडफेकीत बाहेरील व्यक्ती असल्याचा संशय… विसर्जन शांततेत…स्थिती नियंत्रणात…शहरात...

आकोटात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक…दगडफेकीत बाहेरील व्यक्ती असल्याचा संशय… विसर्जन शांततेत…स्थिती नियंत्रणात…शहरात कडकडीत बंद…

आकोट – संजय आठवले

शहरावर असलेला अति संवेदनशीलतेचा डाग विरळ होत असतानाच गणेश विसर्जन मिरवणुकीत दरम्यान एका जमावाकडून झालेल्या दगडफेकीने शहरातील वातावरण पुन्हा गढूळ होऊ लागले असून या दगडफेकीत बाहेर गावातील लोकांचा समावेश असल्याच्या संशयाने या दुर्घटने मागे कोणता तरी राजकीय मेंदू कार्यरत असल्याची चर्चा बळावू लागली आहे. या घटनेखेरीज कोणतीही बाधा न येता अशाही स्थितीत शहरातील गणेश विसर्जन मात्र शांततेत पार पडले आहे. झाल्या प्रकाराचा निषेध नोंदविण्याकरिता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

घटनेची पार्श्वभूमी अशी कि, शहराच्या नंदीपेठ भागातून मुख्य शोभायात्रेत सामील होणेकरिता जय बजरंग गणेश मंडळाचा गणपती जात होता. तितक्यात पाऊस सुरू झाल्याने गणेश मूर्तीवर प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले. एवढ्यात अचानकपणे एक दगड लोकांच्या घोळक्यात पडला. आणि त्यानंतर मोठा दगड वर्षाव सुरू झाला. या प्रकाराने मंडळातील लोक अगदी चक्रावून गेले. खरा प्रकार ध्यानात येईपर्यंत पोलिसांसह मंडळातील अनेक लोक या दगडमाराने जखमी झाले.

या मंडळा सोबत कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके यांनी त्वरित वरिष्ठांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर घटनास्थळी ताबडतोब आरसीपी पथक पाठविण्यात आले. हे पथक घटनास्थळी पोहोचल्यावरही दगडफेक सुरूच होती. ते पाहताच पोलीस पथकाने आपली कार्यवाही सुरू केली. ही कारवाई सुरू होताच मात्र दगड मारणारांमधील काहीजण मागील बाजूने दर्यापूर मार्गाकडे पळून गेले.

त्यानंतर पोलिसांनी कठोर पवित्रा घेऊन स्थिती नियंत्रणात आणली. ही खबर मिळताच नंदी पेठ भागात अनेक जण गोळा झाले. त्यामध्ये उबाठाचे दिलीप बोचे, माजी नगरसेवक मंगेश चिखले, विलास घाटोळ, शिवदास सावरकर यांचे सह कोणत्याही कार्यक्रमात कधीच सामील न होणारी आमदार भारसाखळे यांचे निकटची मंडळी घटनास्थळी हजर झाली. त्यावेळी उपस्थित लोकांना शांततेचे आवाहन करण्यात आले. नंदी पेठ भागात हा प्रकार सुरू असतानाच दुसरीकडे शहरातील मुख्य मार्गाने मुख्य शोभायात्रा शांततेत सुरू होती.

परंतु ह्या घटनेचा परिणाम म्हणून गणेश मंडळांसोबत असलेल्या पोलिसांची संख्या अचानक कमी झाली. आणि ही शोभायात्रा अत्यल्प सुरक्षेत सुरू राहीली. आश्चर्याची बाब म्हणजे कडक पोलीस सुरक्षा असतानाही गणेश मंडळांना पुढे चालण्याबाबत वारंवार सूचना कराव्या लागत असतात. मात्र यावेळी गणेश मंडळ सदस्यांनी स्वतःच समंजस भूमिका घेऊन आपली मंडळी पुढे घेतली. विशेष म्हणजे नियमानुसार ठीक दहा वाजता सर्व मंडळांनी आपली वाद्येही बंद केली. हा प्रकार अगदी अभूतपूर्व असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

गणेश मंडळावर करण्यात आलेल्या दगडफेकीचा कोणताही ताण निर्माण न करता अत्यल्प सुरक्षा व्यवस्थेत शांततेने गणेश विसर्जन होणे हा प्रकार आकोट शहरातील गणेश मंडळांच्या समजदारीचा अति उत्तम नमुना ठरला आहे. नेमकी तीच समजदारी दुसऱ्या जमावाकडूनही प्रदर्शित केली गेली आहे. आकोट शहरात जेव्हा दोन जमातीत तणाव निर्माण होतो, तेव्हा शहराच्या अनेक भागातून अतिशय तीव्र पडसाद जाणवत असतात. परंतु नंदीपेठ मधील या दगडफेकीचे पडसाद नंदी पेठ व्यतिरिक्त अन्यत्र कुठेच जाणवले नाहीत. हा परिसर वगळता कुठलीही शांतता भंग झाली नाही.

एकीकडे दोन्ही जमावांकडून समजूतदारपणाची भूमिका प्रदर्शित होत असतानाच काही हिंदूवादी लोकांनी ह्या दगडफेकीचा निषेध म्हणून दुसरे दिवशी आकोट बंदचे ऐलान केले. परंतु याच दिवशी मुस्लिम समुदायाकडून ईद मिलादुन्नबी निमित्य जुलुसचे आयोजन जाहीर केले गेलेले होते. त्यामुळे प्रशासन वेगळ्याच विवांचनेत सापडले. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल आणि ठाणेदार अमोल माळवे यांनी जुलूसच्या मंडळांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यावर शहराच्या शांतते करिता जुलूस मंडळांनी आपला जुलूस रद्द करण्याची कौतुकास्पद भूमिका घेतली.

याच दरम्यान पोलीस कारवाई मात्र सुरू झालेली होती. त्यामध्ये आतापर्यंत ६८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य लोकांचा शोध जारी आहे. या शोधा सोबतच काही प्रश्नांची उत्तरे मात्र मिळणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे दगडफेकीत असलेले अनोळखी चेहरे जे दर्यापूर मार्गाकडून पसार झाले, ते कोण होते? ते नेमके कुठून आले? दगडफेकीत त्यांचे स्वारस्य का व कशामुळे? या षडयंत्रमागे दडलेल्या राजकीय मेंदूचा मालक कोण? त्याने हा प्रकार का घडवून आणला? महत्त्वाचे म्हणजे शहरातील इतिहासात नंदी पेठ परिसर कधीही अशांततेच्या वादात सापडलेला नाही. येथील हिंदू मुस्लिमांचे एकमेकांशी दैनंदिन व्यवहाराचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते घट्ट संबंध नेमके याच वेळी का उसवले गेले? या प्रश्नांची उकल झाल्यास या दुर्घटने मागील अस्सल चेहरा समोर येणार आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: