संजय आठवले, आकोट
आकोट तालूक्यातील ग्राम जऊळखेड येथिल ग्रामसेवक व सरपंच पती यानी शाळा बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी कंत्राटदारास मागितलेली लाच स्विकारताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने सरपंच पतिस रंगेहाथ पकडले असुन या प्रकरणात सामिल असलेला ग्रामसेवक मात्र फरार झाला आहे. या घटने संदर्भात लाच प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये गावाचा ऊल्लेख चुकल्याने त्या गावचे ग्रामस्थांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
आकोट तालूक्यातील ग्राम जऊळखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नुतनिकरण करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने ग्रामसेवकाकडे कामाचे ४लक्ष ६६ हजार १३२ रुपयांचे देयक सादर केले. त्यानंतर ही रकम आरटीजीएसद्वारे कंत्राटदाराचे खात्यात वळती करावयाची होती. त्यासाठी कंत्राटदाराने स्वाक्षरीकरिता आरटीजिएस फार्म ग्रामसेवकाकडे नेले असता त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी ग्रामसेवक ऊत्तम देविदास तेलगोटे रा. खानापूर वेस आकोट व सरपंचपती आशिष दत्तात्रय निपाणे रा, जऊळखेड ता. आकोट यानी देयक रकमेच्या १०% अर्थात ४६ हजार रुपयांची मागणी केली. ईतकी रकम देण्यास कंत्राटदाराने असमर्थता दर्शविली. त्यावर तडजोड होऊन ४० हजार रुपयात लाच देवघेवीचा व्यवहार पक्का करण्यात आला. त्यानंतर रकम देवघेवीची वेळ तथा स्थान ठरविण्यात आले. त्यानुसार आकोट तालूक्यातील ग्राम करोडी फाट्यानजिकच्या हिस्सार पेट्रोल पंपावर रकम देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे कंत्राटदाराने सरपंच पती आशिष निपाणे ह्यास ४० हजार रुपये दिले.
त्यावेळी पेट्रोल पंपाचे परिसरात लाच प्रतिबंधक विभागाचे लोक सापळा रचून टपलेले होते. आशिष निपाणे ह्यास लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक करण्यात आली. ह्यावेळी ग्रामसेवक ऊत्तम देविदास तेलगोटे हा घटनास्थळी हजर नव्हता. म्हणून पो.नि. नरेंद्र खैरनार व त्यांचे चमूने घटनास्थळाचे परिसरात व खानापूर वेस येथिल घरी त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. लाच घेण्या संदर्भात लाच प्रतिबंधक विभागाने ग्राम सेवक ऊत्तम देविदास तेलगोटे व सरपंचपती आशिष दत्तात्रय निपाणे ह्यांचे विरोधात गुन्हा दाखल केला.
घटनेनंतर लाच प्रतिबंधक विभागाने घटनेची प्रेस नोट जारी केली. मात्र अनवधानाने ग्राम जऊळखेड ऐवजी ग्राम जऊळका असा ऊल्लेख प्रेस नोटमध्ये झाला. काही ऊताविळ लोकानी सोशल मिडीयावर ही खबर प्रसारीत केली. त्यामूळे ग्राम जऊळका येथिल सरपंच व त्यांचे समर्थक चांगलेच भडकले. त्यांनी ही खबर प्रसारीत करणारांविरोधात पोलिसात जाण्याची तयारी केली. मात्र काही समजदार लोकानी ही लाच प्रतिबंधक विभागाचे प्रेस नोटमधिल चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले.