आकोट – संजय आठवले
मोटर सायकल चोरीच्या फिर्यादीवरून या मोटरसायकलचा कसून शोध घेतला असता, आकोट ग्रामीण पोलिसांनी चक्क ९ मोटरसायकल्स आणि मोटरसायकलचे १ इंजिन चोरट्यांकडून हस्तगत केले असून ३ लक्ष ४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चोरी संदर्भात ३ आरोपींना अटक केली असून या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु याच आरोपींवर अन्य गुन्हेही दाखल असल्याने आकोट ग्रामीण पोलीस त्यांना पुन्हा अटक करणार आहेत.
या प्रकरणाची हकीगत अशी कि, दि. ७.७.२०२४ रोजी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे विजय शहादेव कसुरकार वय ४४ वर्षे रा. ग्राम बोर्डी यांनी जबानी फिर्याद दिली कि, ग्राम बोर्डी आठवडी बाजाराजवळ उभी असलेली बजाज बाॅक्सर क्रं. एम. एच.३० के.५८७० किं. अं. २०,००० रु. ची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांने चोरून नेली आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर, सुरज गुंजाळ सहायक परि. पोलीस अधीक्षक प्रभारी ठाणेदार पो. स्टे. आकोट ग्रामीण तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू याचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार उमेशचंद्र सोळंके बक्कल नं. ०३, पोउपनि विजय पंचबुधे ,सपोउपनि दादाराव लिखार ब. नं. ६२१,पोहेका विलास मिसाळ ब. नं. ११३७, पोहेका हरिष सोनोने ब न १७१७ , नापोका योगेश जऊळकर बनं. १६११, पोका उमेश दुतोंडे ब. नं.२२४२, पोका सागर नागे ब. नं.२६३ यांनी केला.
सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा कसून शोध घेण्यात आला. त्यावेळी ही चोरून नेलेली मोटर सायकल व या व्यतिरिक्त आणखी चोरलेल्या ८ मोटरसायकल्स व एक टीव्हीएस व्हिक्टर मो. सा. चे इंजिन असा एकुण नऊ मोटरसायकल व एक इंजिन असा एकुण ३ लक्ष ४ हजार रुचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला. या चोरी प्रकरणी आरोपी नामे रुपराव रामदास लासुरकर वय 44 वर्षे, गोपाल सुरेश अढाऊ वय 24 वर्षे, गोपाल मनोहर सदाफळे वय 32 वर्षे तिन्ही राहणार ग्राम बेलखेड ता. तेल्हारा जिल्हा अकोला यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्याचा तपास अवघ्या १२ तासांच्या आत पूर्ण केला गेला. या आरोपींवर रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपींना आकोट न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु फिर्यादीत नोंदविलेली मोटर सायकल मिळून आली असल्याने न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावरून या आरोपींची अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात परवानगी करण्यात आली. परंतु या आरोपींवर आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अजूनही ४ गुन्हे दाखल असल्याने न्यायालयाची परवानगी घेऊन या आरोपींना पुन्हा अटक करण्यात येणार आहे.