आकोट संजय आठवले
आकोट तालुक्यातील ग्राम पोपटखेड नजीक तपासणी नाका मार्गाने गोवंश तस्करी करणाऱ्या चार इसमांना आकोट ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचेकडून तब्बल ५ लक्ष १५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या तस्करांकडील दोन गाईंना जीवदान देण्यात आले आहे.या चौघांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली असून या आरोपींना मदत करणाऱ्या फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
शेजारचे राज्य मध्यप्रदेश येथून धारणी मार्गाने सातपुड्याच्या घनदाट जंगलातून मोठ्या प्रमाणात गोंवश तस्करी होत असल्याच्या गोपीनिय माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावर त्यांनी घनदाट जंगलात नाकाबंदी करुन रात्रभर पाळत ठेवली. दिनांक २३ जुन २०२३ रोजी पहाटे पोपटखेड तपासणी नाक्या नजीक आलेल्या टाटा एस क्र. एम.एच.०४.ई. बि. ४१७५ थांबवून तपासणी केली. त्यावेळी दोन गायीं अंत्यत निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांची सुटका करुन पोलिसांनी वाहन चालकासह दोघांना ताब्यात घेतले.
सोबतच पोलिसांवर पाळत ठेवणाऱ्या दोघांना मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळुन विना नंबरची काळ्या रंगाची त्यावर निळे पट्टे असलेली हीरो पेशन कंपनीची मोटर सायकल जप्त करण्यात आली. अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने गोवंश तस्करी प्रकरणी अमित जयकिसन रा. पोपटखेड, शाहीद उर्फ बबलु ईनामदार, राजीक ईनामदार रा. धारूळी वेस आकोट व अन्सार खान मुजप्फर खान रा. ईप्तेखार प्लाट, ईरा हायस्कुल जवळ आकोट जि. अकोला, श्रीकृष्ण सिध्दार्थ रा. पोपटखेड ता. आकोट यांना ताब्यात घेऊन कलम ५ (अ), ९ महा. प्राणी संरक्षण अधिनीयम सहकलम ११ (१) (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनीयम १९६०, सहकलम ११९ महा. पोलीस १९५१ अन्वये गुन्हा दाखल करुन चौघांना अटक करण्यात आली आहे. यांतील फरार आरोपींचा खकोट ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कारवाई आकोट उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक रितु खोखर व परीक्षावधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे, योगेश जुळकर, गोपाल जाधव, वामन मिसाळ, सुनील वैराळे, नंदकिशोर नेमाडे, होमगार्ड जनार्धन सुरजसे यांनी केली.